राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पु्न्हा एकत्र येण्याच्या चर्चांना तुर्तास स्वल्पविराम मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी अजित पवार यांनी अलीकडच्या काळात त्यांच्यावर कडाडून टीका करणारे त्यांचे बंधू आणि युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्याबाबतही भाष्य केले आहे. माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे. तो फारच टोकाचे बोलायला लागला आहे. कशामुळे त्याला असे वाटायला लागले, त्याचा स्वभाव असा का झाला कळायला मार्ग नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी या मुलाखतीत युगेंद्र पवार आणि बारामतीच्या लढाईबाबतही भाष्य केले आहे. यावेळी घरातला सख्खा पुतण्या उभा आहे. मी राजकीय भवितव्य पणाला लावले असे मला वाटत नाही. ही लढाई आमच्या मतदारांनी हातात घेतली आहे. जसे लोकसभेला त्यांनी ठरवले होते. सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजितदादा त्या पद्धतीने ते करतील, असे अजित पवार यांनी म्हटले.