SUNITA WILLIAMS NEWS UPDATE :  नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यमस आणि बुच विल्मोर नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर आज ते पृथ्वीतलावर पोहोचले आहेत. एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सने केलेल्या कामगिरीने ते सुखरुपपणे पृथ्वीतलावर उतरले आहेत. आठ दिवसांची मोहिम तब्बल ९ महिने लांबल्याने सुनीता विल्यम्स यांच्या परतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे त्यांचं कॅप्सुल फ्लोरिडाच्या समुद्रात उतरताच जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्यासाठी तर भारतात यज्ञ करण्यात आला होता. त्यांच्या परतीसाठी भारतीयांनीही प्रार्थना केली होती. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचं स्वागत केलंय. सुनिता विल्यम्स व बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेने अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने मोहीम आखली होती. स्पेसएक्सच्या अवकाशयानाने १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं आणि आज पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतलंय. म्हणून त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे.

सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा अचूकता उत्कटतेला आणि तंत्रज्ञान दृढतेला मिळते तेव्हा काय होते हे त्यांनी दाखवून दिले आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, सुनीता विल्यम्स यांचा काल परतीचा प्रवास झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतभेटीसाठी पत्र लिहिले होते. तुमची प्रेरणादायी जिद्द आणि परिश्रम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मिशनच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर आम्ही तुमचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत. यजमानपद भूषवणं ही भारतासाठी अभिमानाची बाब असेल. तुम्हाला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर शेअर केलेल्या पत्रात नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे.