चालत्या गाडीत वकिलावर चाकूने हल्ला…

वालीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजीत शर्मा याने हर्षद वाला (वय २६) या तरुणाला हल्ला करण्याचे काम सोपावले होते. हर्षद वाला याने अनीस अब्बासी यांना संपर्क केला. एका प्रकरणात वकीलपत्र घ्या म्हणून हर्षद वाला याने वकील अब्बासी यांना सांगितले. मात्र अब्बासी यांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर हर्षद वाला याने अब्बासी यांच्या सहकार्‍यांंकडून अब्बासी यांचे तपशील काढले आणि कार्यालयात भेटायला गेला. रमझानचा महिना सुरू असल्याने अब्बासी रात्री उशीरा कार्यालयात आले होते. त्यावेळी हर्षद वाला त्यांना भेटायला आला आणि पुन्हा त्याचे वकीलपत्र घेण्याची विनंती केली होती. मात्र त्याला अब्बासी यांनी नकार दिला होता. त्यानंतर हर्षद वाला याने परत जाण्यासाठी ओला गाडी बुक केल्याची थाप मारली आणि काही वेळ तिथेच घुटमळत होता. नंतर ओला गाडी आली नसल्याचे कारण देत त्याने वकील अब्बासी यांना अर्ध्या रस्त्यात सोडण्याची विनंती केली. त्यानुसार अब्बासी यांनी आपल्या गाडीत त्यांना सोबत घेतले. अब्बासी गाडी चालवत होते. वसई पूर्वेच्या शालीमार हॉटेलजवळ गाडी पोहोचताच हर्षद वाला याने आपल्या खिशातून चाकू काढून चालत्या गाडीत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. कशीबशी त्यांनी गाडी थांबवली आणि मदतीचा धावा केला. स्थानिकांनी मग वाला याला पकडून वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले. मी त्या महिलेचे वकीलपत्र घेतले होते. तिला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करत होतो. शर्मा याच्या कुठल्याही दबावाला किंवा आमिषाला मी बळी पडलो नाही.असे वकील अब्बासी यांनी सांगितले. अब्बासी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी हर्षद वाला याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८ (१), ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा मुख्य आरोपी इंद्रजीत शर्मा हा सध्या फरार आहे. वालीव पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी हर्षद वाला हा नेमका कोण आहे ? तो भाडोत्री गुंड आहे का ? त्याचा हल्ला करण्यामागे काय उद्देश आहे ? याचा आम्ही तपास करत आहोत अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली आहे.