शुक्रवारी शरद मोहोळ याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळ याची ओळख आहे. शरद मोहोळ याच्यावर अनेक प्रकरणात गुन्हा दाखल आहे.
पुणे शहरात भरदिवसा गोळीबार झाला आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
गोळीबाराचा थरार
पुण्यातील कोथरुड या ठिकाणी अज्ञात हल्लोखोरांनी शरद मोहोळ यांच्यावर एकामागे एक तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली. त्यानंतर शरद मोहोळ याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची माहिती घेतली जात आहे
शरद मोहोळ कोण ?
शरद मोहोळ पुणे येथील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळी युद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून झाला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात त्याला जामीन मिळाला. त्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना सिद्दीकीचा त्याने खून केला होता. या खटल्यातून त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते.