TIMES OF AHMEDNAGAR
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमत गाठेल, अशी शक्यता सर्वच एग्झिट पोल्सनी वर्तविली होती. मात्र काल (८ ऑक्टोबर) मतमोजमीच्या काही तासातच भाजपने आघाडी गाठली आणि मतमोजणी पूर्ण होईपर्यंत त्यांनी बहुमताचा निश्चित आकडाही पार केला. यामुळे काँग्रेसची बरीच नाचक्की झाली. निकालाच्या आधीच मुख्यमंत्री कोण होणार ? यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाले होते. मात्र त्यांना सलग तिसऱ्यांदा पराभव सहन करावा लागला. हरियाणात काँग्रेसचा विजय होणारच, असा दावा काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. मात्र त्यांचा दावा फेल ठरला. यावर आता राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एक्स अकाऊंटवर त्यांनी पोस्ट टाकत हरियाणाच्या पराभवावर भाष्य केले आहे.
(संग्रहित दृश्य.)
हरियाणा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले….
राहुल गांधी यांनी सर्वात आधी जम्मू-काश्मीरच्या लोकांचे आभार मानले. राज्यात इंडिया आघाडीचा विजय झाल्यामुळे संविधानाचा विजय झाला. लोकशाहीच्या स्वाभिमानाचा विजय झाला, असे राहुल गांधी म्हणाले.
तसेच हरियाणा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आयोगाबद्दल तक्रारी येत आहेत. त्याबद्दलही कार्यवाही करू. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल हरियाणामधील सर्व नागरिकांचे मनस्वी आभार आणि आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आम्ही सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठीचा आणि सत्याचा संघर्ष सुरूच ठेवू.