मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत आपल्या पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. आम्ही हे करु, या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात चार प्रमुख भाग आहे. यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा आणि जीवनमान, दुसऱ्या भागात दळवळण, तिसऱ्या भागात औद्योगिक धोरण आणि चौथ्या भागात मराठी अस्मिता अशा मुद्द्यांचा समावेश आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजना आणि उद्धव ठाकरे यांच्या राज्यभरात शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्याच्या आश्वासनाबाबत टिप्पणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्यभरात शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करणार, असे म्हटले आहे. पण त्याऐवजी राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे आहे आणि राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मग शिवाजी महाराजांच्या मंदिरांची गरज काय? त्याऐवजी राज्यातील मुलांना शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे. असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच मनसेच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजना किंवा महालक्ष्मी योजना यासारख्या योजनांचा समावेश का नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले, याचं कारण महाराष्ट्राचं एकूण आर्थिक गणित पाहिल्याशिवाय मी असल्या घोषणा करु शकत नाही. असल्या घोषणांना अर्थ नसतो. महाराष्ट्रावर आर्थिक बोजा न येता या योजना सुरु राहिल्या तर मी त्याला गिफ्ट म्हणेन. पण उद्या या गोष्टी सुरु राहिल्या नाहीत तर मी या योजनांना लाच म्हणेल. अशा योजना सुरु करताना राज्याचा आर्थिक ढाचा बिघडता कामा नये. सरकारकडून महिलांना पैसे मिळतात, याचा आनंद आहे. पण या सगळ्यातून आपण काही वेगळे खड्डे तर खणून ठेवत नाही ना, हेदेखील तपासले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना अद्याप या सभेसाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी मी मुंबई आणि ठाण्याच प्रचार करेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.