TIMES OF AHMEDNAGAR
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज बारामतीत भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषण करताना आमदार रोहित पवार हे भावूक झाले. रोहित पवार भाषण करताना ढसाढसा रडले. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतरचा शरद पवार यांच्यासोबतचा एक प्रसंग आपल्या भाषणात सांगितला. रोहित पवार यांनी यावेळी शरद पवार यांना विनंती देखील केली. अहो, जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते, पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबर बसलो होतो. शरद पवारांसोबत चर्चा करत होतो. शरद पवार टीव्हीकडे बघत होते. त्यांनी चेहऱ्यावर दाखवलं नाही. टीव्ही बघत-बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिलं. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही अजिबात काळजी करु नका. आपला जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे तो आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी आपण नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची. जोपर्यंत नवी पिढी ही जबाबदारी घेत नाही किंवा जबाबदारी घेण्याच्या लेव्हलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे शरद पवार यांचे शब्द आहेत असं रोहित पवार यांनी सांगितलं आणि त्यांना भर मंचावर रडू कोसळलं.
स्त्रोत.सोशल मिडिया
मी सत्तेत गेलो असतो तर ती कारवाई झाली नसती.
यावेळी रोहित पवार हे रडत-रडत म्हणाले, साहेब मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करुन पुन्हा करु नका. तुम्ही आमचे जीव आहात. तुम्ही आमचे आत्मा आहात. तसेच लोकं तुम्हाला त्रास देतात, ते मोठे नेते जरी असले तरी सामान्य माणसं, आमच्यासारखे छोटेमोठे कार्यकर्ते आणि आख्ख पवार कुटुंब तुमच्याबरोबर आहे. साहेब आम्ही स्वार्थासाठी लढत नाहीत. कदाचित मलाही मंत्रीपदाची शपथ मिळू शकली असती. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी जी कंपनी उभी केली कुठलिही चूक नसताना त्या कंपनीवर कारवाई केली. मला माहिती होतं की मी सत्तेत गेलो असतो तर ती कारवाई झाली नसती असं रोहित पवार पवार म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया
तुम्ही केलेले ६० वर्षातले कष्ट आम्ही कधीच विसरणार नाही.
आम्ही सत्तेसाठी तुमच्याबरोबर नाहीत. आम्ही सर्व विचारांसाठी तुमच्यासोबत आहोत. तुम्ही केलेले ६० वर्षातले कष्ट आम्ही कधीच विसरणार नाहीत. कुणी आम्हाला काहीही दिलं तरी आम्ही स्वार्थमध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा, आम्ही सर्वजण तुमच्या शब्दावर लढायला तयार आहोत असं रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्रात तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के २०२४ ला महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. जे शब्द दिले आहेत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शंभर टक्के पूर्ण करणार असा दावा रोहित पवारांनी केला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
ताई एकट्या पडल्या.
सुप्रिया ताईंना काय म्हणतात, राजकीय यंत्रणा सोबत घेऊन गेल्यानंतर ताई एकट्या पडल्या. रक्ताचं नातं असणारा भाऊ काय कारणास्तव नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी, त्यांच्या साम्राज्यावर जी कारवाई झाली ते वाचवण्यासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी ते पलिकडे गेले असले तरी इतर रक्ताचे नाते असणारे सर्व भाऊ आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण तुमच्यासोबत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याबाबत निश्चिंत राहा. शरद पवार हे वटवृक्ष आहेत. वटवृक्षाला पारंब्या असतात. शेकडो पारंब्या असतात. त्यामुळे एक-दोन पारंब्या तोडल्या तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं असं यावेळी रोहित पवार म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
शरद पवार तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत.
रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटावर निशाणादेखील साधला. तुम्हाला हीच निवडणूक नाही तर अशा अनेक निवडणुकांममध्ये शरद पवार तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत. यांच्याबरोबर अजित पवार जावून बसले. असं भाषण पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं ? बदललेले दादा आम्हाला नाही पटत असं लोकं म्हणतात तरी हे शांत बसतात ? अहो तिथे कन्हेरीला कोण आला होता तो वेडा बांदल, तो मंचावर काय बोलला ? शरद पवारांच्या चेहऱ्याबद्दल तुम्ही बोलता, शरद पवारांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही बोलता, अहो जुने अजित दादा असते तर त्यांनी त्या बांदलाला कानफाडलं असतं. अहो तीन-साडेतीन चार वर्ष नको त्या करणासाठी हा जेलमध्ये होता. पण नवीन अजित दादा, बदललेले दादा तिथे बसून काय करत होते, खाली डोकं घालून हसत होते. हे आपले संस्कार ? यांचं उत्तर द्यायचं की नाही ? असा सवाल रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना केला.