TIMES OF AHMEDNAGAR
अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आज (२५ नोव्हेंबर) कराड येथे जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी अजित पवार यांची प्रीतीसंगमावर (कराड) असताना आमदार रोहित पवारांशी भेट झाली. यावेळी रोहित पवार हे अजित पवारांच्या पाया पडले. त्यानंतर अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं म्हणाले. दरम्यान अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली असती, एखाद्या सभेला संबोधित केलं असतं किंवा प्रचार केला असता तर रोहित पवार पराभूत झाले असते असं स्वतः राम शिंदे म्हणाले आहेत. यावर रोहित पवार म्हणाले, कदाचित उलटा निकाल लागला असता. मात्र अजित पवार बारामतीत अडकून पडले होते.कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला आहे. रोहित पवारांना १,२७,६७६ मतं मिळाली आहेत. तर, राम शिंदे यांना १,२६,४४३ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

अजित पवार यांना भेटल्यानंतर त्यांच्या पाया पडलो.
अजित पवारांना भेटल्यानंतर व त्यांनी केलेल्या टिप्पणीवर रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ते माझे काका आहेत. म्हणून मी त्यांच्या पाया पडलो. आता जरी आमच्या विचारांमध्ये भिन्नता असली तरी घरातील ज्येष्ठांच्या पाया पडणं ही आपली संस्कृती आहे. अजित पवार हे आमच्या घरातील वडीलधारे आहेत. २०१९ च्या निवडणुकीवेळी त्यांनी मला खूप मदत केली होती. तसेच ते माझे काका देखील आहेत. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडणं ही माझी जबाबदारी आहे. तसेच ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे. हे त्यांचं स्मृतीस्थळ आहे. इथे भेदभाव करून चालणार नाही. आपण आपली संस्कृती जोपासलीच पाहिजे आणि आम्ही तरी ती जोपासतो. मी त्यानुसार अजित पवार यांना भेटल्यानंतर त्यांच्या पाया पडलो.


