हिंदू संघटनांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या मागणीची याचिका दाखल केली होती.
मथुरेतली शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल देत शाही ईदगाह मशीद परिसराचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे.मशीद परिसरातील कोणकोणत्या भागांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे याबाबतचा निर्णय १८ डिसेंबर रोजी घेतला जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू जैन यांनी याप्रकरणी न्यायालयाकडे तीन आयुक्तांच्या नियुक्तीची मागणी केली आहे.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय ?

भगवान श्री कृष्ण विराजमान ट्रस्ट आणि इतर सात जणांनी विधीज्ञ हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या माध्यमातून अलाहाबाद उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेद्वारे मशीद परिसराचं एएसआय सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. हिंदू पक्षकारांनी न्यायालयात दावा केला आहे की, भगवान श्रीकृष्णाचं जन्मस्थान असलेल्या या जमिनीवर पूर्वी श्रीकृष्णाचं भव्यदिव्य मंदिर होतं. हे मंदिर पाडून तिथे मशीद बांधण्यात आली होती,हिंदूंचं प्राचीन मंदि मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आलं आणि त्याच जागेवर मशीद बांधण्यात आली असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

न्यायालयाची भूमिका काय आहे ?
हिंदू पक्षकारांच्या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने शाही ईदगाह परिसराचं एएसआय सर्वेक्षण करण्यास मंजुरी दिली आहे. याआधी वाराणसीतल्या ज्ञानवापी मशीद परिसराचं एएसआय सर्वेक्षण करण्यात आलं होतं. न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांच्या देखरेखीखाली हे सर्वेक्षण करण्यात आले होते. हिंदू पक्षकारांनी मागणी केली होती की शाही ईदगाह मशीद परिसराचं सर्वेक्षण करत असताना त्याचं व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रण केलं जावं. तसेच फोटो काढावेत. हिंदू पक्षकारांनी मागणी केल्याप्रमाणे शाही ईदगाह परिसरात हिंदूंची प्रतीकं, चिन्हं आणि मंदिर पाडून त्याच जागी मशीद बांधल्याचे पुरावे शोधण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती आहे.
उच्च न्यायालयाने दिली परवानगी.
हिंदू पक्षकारांनी डिसेंबर २०२२ मध्ये मथुरा न्यायालयात विवादित परिसराच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती. मथुरा न्यायालयाच्या मंजुरीनंतर मुस्लीम पक्षकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयानेही या सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे.विधीज्ञ विष्णू जैन म्हणाले, १६६९ मध्ये औरंगजेबाच्या आदेशानंतर मुघलांनी हिंदूंची अनेक मंदिरं उध्वस्त केली. मथुरेतील मंदिर तोडून तिथे शाही ईदगाह मशीद उभारण्यात आली. ज्ञानवापी मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणातून सत्य समोर आलं, त्याचप्रमाणे मधुरेत्या मशिदीचं सत्य बाहेर येईल असे त्यांचे म्हंटले आहे.