बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी, इंटीरियर डिझायनर आणि सिने प्रोड्यूसर गौरी खान हिनं मुंबईतलं खार पश्चिम इथे अपस्केल पंकज सोसायटीमध्ये एक फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गौरी खाननं हा फ्लॅट स्वतःसाठी नाहीतर तिच्या स्टाफसाठी घेतला आहे.स्वतः गौरीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहाते. शाहरुख-गौरीच्या आलिशान ‘मन्नत’चं रिन्यूएशन सुरू असल्यामुळे दोघेही मुलांसह भाड्याच्या घरात राहत आहेत. अशातच आता एवढ्या मोठ्या किंमतीचा फ्लॅट आपल्या स्टाफसाठी भाड्यानं घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. गौरी खाननं फ्लॅट भाड्यानं घेतल्याची माहिती झॅपकी साईटवरुन समोर आली आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन रेंटल अॅग्रीमेंट आहे, ज्यावरुन कळतं की, चौथ्या मजल्यावर (फ्लॅट क्रमांक ६) असलेला हा ७२५ चौरस फूट अपार्टमेंट तिचा स्टाफ वापरणार आहे. हा फ्लॅट शाहरुख-गौरी सध्या भाड्यानं राहात असलेल्या डुप्लेक्सपासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे.
(संग्रहित दृश्य.)
दिलदार गौरी खान.
गौरीनं अपार्टमेंट संजय किशोर रमानी यांच्याकडून महिना १.३५ लाख रुपयांवर घेतला आहे. म्हणजेच, वर्षाचे १६.२ लाख रुपये. यासाठी गौरी खाननं ४.०५ लाख रुपयांचं सिक्योरिटी डिपॉझिट ठेवलं आहे. हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर वर्षभरानंतर याच्या भाड्यात तब्बल ५ टक्क्यांची वाढ होणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला शाहरुख खाननं खार येथील पाली हिलमध्ये तीन वर्षांसाठी ८.६७ कोटी रुपयांना दोन डुप्लेक्स भाड्यानं घेतले होते. ज्यामध्ये तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंब राहतंय. एका घरासाठी तो दरमहा ११.५४ लाख रुपये भाडं देईल आणि दुसऱ्या घरासाठी तो सुमारे १२.६१ लाख रुपये भाडं भरणार आहे.