राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश बंडखोरांना आपले अर्ज माघारी घेतले आहेत. मात्र, काही ठिकाणी बंडखोरी कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यातच, पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांच्याकडून हा प्रयत्न झाला असून काळेवाडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, ओव्हाळ यांनी हे पाऊल का उचललं याबाबतचं कारण अद्याप ही स्पष्ट झाले नाही.
(संग्रहित दृश्य.)
निवडणुकीच्या तोंडावर मागण्या मान्य होतील या अपेक्षेने….
या घटनेत पवार यांच्या खाजगी गाडीचे मागच्या चाकाजवळील भागाचे नुकसान झाले आहे. ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रकार का अवलंबला याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. उमेदवारी अर्जाबाबत दोघांमध्ये काही वाद झाला होता का? याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळालं नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीन लावण्याची परवानगी दिली नाही. यामुळं संतापलेल्या ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ओव्हाळ यांची नाराजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टलाही ओव्हाळ यांनी आयुक्तांची गाडी ही फोडली होती. विनायक ओव्हाळ सोबत आणखी दोघे उपस्थित होते. नागेश काळे हे दिव्यांग आणि अजय गायकवाड अशी त्यांची नावं आहेत. काळे सुद्धा दिव्यांग असून त्यांच्या रिक्षातून ओव्हाळ (ग) प्रभागात आले होते. तिथून चिंचवड विधानसभेचे कामकाज चालते. काळे यांचं घरकुल योजनेतून मिळणारे घर प्रतीक्षेत आहे, तर गायकवाड यांनी विनायक ओव्हाळ यांना पवारांच्या कार्यालयात नेहण्याचं अन् खाली आणण्याचे काम केले. थेरगाव रुग्णालयात प्रचंड लूट होते. ही लूट थांबवावी म्हणून ते पालिकेकडे पाठपुरावा करतात. या सगळ्या प्रलंबित मागण्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर मान्य होतील. या अपेक्षेने त्यांनी हे नको ते पाऊल उचललं आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.