महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली असताना ठिकठिकाणी उमेदवार हल्ला झाल्याचेही प्रकार समोर आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह विदर्भ आणि पुण्यातही हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेनेचे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार, आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची ( सिद्धार्थ शिरसाट ) गाडी फोडण्यात आली आहे. याप्रकरणी संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. राजू शिंदे मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचं काम करत आहेत. परंतु, जनता यांची दहशत मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. संजय शिरसाट म्हणाले, मी आतापर्यंत ३ निवडणुका लढल्या आहेत. पण असा प्रकार पाहिला नाही. गाडीवर मारण्यात आलेला, दगड एवढा मोठा होता की दुर्दैवानं काहीही घडू शकलं असतं. मी ८ दिवसांपूर्वी पोलिसांना सूचित केले होतो. काही लोक नगर, पुणे आणि नाशिकमधून संभाजीनगरमध्ये आली आहेत. २ ब्लॅक स्कॉर्पिओ विनानंबर प्लेट शहरात फिरतायेत. माझ्या पत्नीच्या वाहनाचा पाठलाग काही दिवसांपूर्वी झाला होता. निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानं अशाप्रकारच्या घटना घडवल्या जात आहेत. लोकांनी मतदानाला येऊ नये, मतदान करू नये, म्हणून हे प्रकार सुरू आहे. जर असे काही घडणार असेल, तर आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असं शिरसाट यांनी ठणकावून सांगितलं आहे. राजू शिंदे यांनी गुंडांची फौज आणली आहे. मतदारसंघात दहशत निर्माण करून जनतेचे राजे होऊ, असं त्यांना वाटते. दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे. मतदार घाबरतील, असं त्यांना वाटतं. मात्र, जनता यांची दहशत मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी वॉर्निग शिरसाट यांनी दिली आहे.