महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२४ मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यातच काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर आता नसीम खान यांच्या देखील जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. बाबा सिद्दिकी प्रकरणानंतर मुंबई पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
(संग्रहित दृश्य.)
पोलिस अधिकार्यांनी नसीम खान यांच्या घराबाहेर…
नसीम खान यांच्या कार्यालयात दोन संशयित आढळून आले होते. या दोन संशयितांच्या मोबाइलमध्ये नसीम खान यांच्याशी संबधित काही आक्षेपार्ह चॅटही आढळले होते. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी नसीम खान यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाजवळ स्थानिक पोलीसठाण्यांना बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नसीम खान यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. दोघांपैकी एकाने पवईच्या हिरानंदानी भागात एका काँग्रेस कार्याकार्त्याकडेच नसीम खान यांच्याबाबत विचारणा केली होती.नसीम खान यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपी थेट नसीम खान यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यातील एकाने खान यांच्या भेटीची इच्छा वक्त केली. नसीम खान यांच्यापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कार्यकर्त्यांनीच दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. नसीम खान हे मुंबईतील कॉंग्रेसचा जुनाजाणता चेहरा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे ते कार्यकारी अध्यक्ष असून माजी मंत्री राहिलेत . या घटनेनंतर चांदिवाली मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.