गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाने जप्त केले ४० लाखांचे मेफेड्रोन, पिस्तूल.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | ANTI-NARCOTICS DEPARTMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात छापा टाकून ४० लाख रुपयांचे मेफेड्रोन आणि देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहेत. कोंढव्यातील भाग्योदयनगर परिसरात समीर शरीफ शेख (वय २२, रा. सय्यद काझी हाईट्स, कोंढवा) याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती गस्त घालणारे अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शेख याच्या घरावर छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने शेखच्या घरातून ४० लाख रुपयांचे २०२ ग्रॅम मेफेड्रोन, देशी बनावटीचे पिस्तूल, मोबाईल संच असा ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपूल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख यांनी ही कारवाई केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
५३० ग्रॅम गांजा जप्त.
बिबवेवाडी भागातील चैत्रबन सोसायटी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. आयुष अनंत शिंदे (वय २०, रा. शनी मंदिरामागे, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५३० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या आकाश राजू घाेरपडे (वय २३, रा. दत्त मंदिराजवळ, खुळेवाडी, विमानानगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ७०५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. घोरपडेचा साथीदार धनंजय दशरथ पवार याला अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे (दोन) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथकाने ही कारवाई केली आहे.