TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | BHINGAR CAMP POLICE STATION | ARMY | | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|
लष्कराच्या गणवेशाची हुबेहूब नक्कल करून बनावट गणवेश तयार करून त्याची नाशिक व नगर येथे विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला लष्कराच्या पुण्यातील सदन कमांड येथील मिलिटरी इंटीलीजन्सच्या पथकाने शुक्रवारी (दि.२) भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरातून ताब्यात घेतले. सुरेश खत्री (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४० बनावट गणवेश व एक कार ताब्यात घेण्यात आली असून, त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, लष्कराच्या या गणवेशाची नक्कल करून बनावट गणवेश खुल्या बाजारात विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील काही नावेही इंटीलीजन्सच्या पथकाला मिळाली आहेत. ते दोघे नवी दिल्ली व राजस्थान येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यादृष्टीने इंटीलीजन्सच्या पथकाकडून तपास सुरू आहे.
लष्कराने त्यांच्या गणवेशाचे पेटंट घेतले असून दहा वर्षांपर्यंत कॉपीराइट केले आहे. या डिझाईनचे गणवेश लष्कराचे अधिकृत सीएसडी वगळता इतरत्र तयार करण्यास व विक्रीस मनाई आहे. असे असतानाही नाशिक येथील एक व्यक्ती हुबेहूब नक्कल करून तयार केलेले गणवेश नाशिक व नगर येथील सैनिकांना विकत असल्याची माहिती इंटीलीजन्सच्या पथकाला मिळाली होती.
तो नगरमध्ये कॅन्टोन्मेंट परिसरात असल्याचे समजताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ४० गणवेश आढळून आले. ते जप्त करण्यात आले असून त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नगर येथील सेना पोलिस कर्मचाऱ्यामार्फत फिर्याद घेऊन त्याच्यावर शुक्रवारी (दि. २) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.