अहिल्यानगर : राहुरी शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी घेऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी संपुष्टात आले आहे. या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळाले असून आरोपींना तातडीने अटक न झाल्यास हा लढा राज्यभर पसरवण्याचा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. समाजात शांतता आणि भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे यासाठी त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला आहे. तिसऱ्या दिवशी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार नीलेश लंके आणि माजी आमदार दादा कळमकर यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. या प्रसंगी राहुरीत बंद पाळण्यात आला ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपोषण मागे घेतले असले तरी समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे. राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना ही केवळ स्थानिक घटना नसून समाजात अशांतता पसरवण्याचा कुटील डाव आहे. असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. पोलिस यंत्रणा सक्षम आहे तरीही २१ दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. यामागे सत्ताधारी शक्तींचा हात आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. असे प्राजक्त तनपुरे यांनी ठणकावले आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा राज्यात कार्यरत असल्याचा गंभीर आरोपही प्राजक्त तनपुरे यांनी केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाचे कौतुक करत म्हटले तीन दिवसांचा आत्मक्लेष हा समाजातील अन्यायाविरुद्धचा लढा आहे. राष्ट्रपुरुषांचा अपमान हा जाणीवपूर्वक कट आहे. याचा तपास तातडीने होऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
(संग्रहित दृश्य.)
२१ दिवसांनंतरही आरोपी मोकाट : निलेश लंके
खासदार नीलेश लंके यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका करत म्हटले २१ दिवसांनंतरही आरोपी मोकाट आहेत. उपोषणाला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. जर लवकरच कारवाई झाली नाही तर जेलभरो आंदोलन छेडले जाईल. त्यांनी समाजात शांतता राखण्याचे आवाहनही केले. वरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भरदुपारी अशी घटना घडते, आणि तपासाला गती मिळत नाही. समाजकंटकांचे मनोबल वाढवणारी ही परिस्थिती आहे. शहरात भयमुक्त वातावरण हवे असे ते म्हणाले. तिसऱ्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांचे वजन अडीच किलोने कमी झाले होते. वैद्यकीय सल्ल्याने त्यांना सलाइन देण्यात आले. उपोषणात सहभागी असलेल्या पप्पू कल्हापुरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने उपोषणकर्त्यांच्या निष्ठेची आणि त्यागाची झलक दिसून आली. उपोषणाला माजी आमदार प्रसाद तनपुरे, रावसाहेब खेवरे, रवींद्र मोरे, सुरेश वाबळे, नंदकुमार तनपुरे, प्रशांत डौले, गणेश आघाव, हर्ष तनपुरे आणि अशोक तुपे यांच्यासह अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. राहुरीतील बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली एकजूट दाखवली. प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण मागे घेतले असले तरी हा लढा थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. आरोपींना तातडीने अटक न झाल्यास हा मुद्दा राज्यस्तरावर उचलला जाईल असा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिला.