अ.नगर : सावेडी उपनगरात निर्मलनगर परिसरातील पत्राचाळ, रो-होंसिंग, गाडेकर चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून रहिवासियांच्या घरांवर दगडफेक केली जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या संदर्भात रहिवाशांनी तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार मागील १५ ते २० दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती घरांवर मोठे दगड फेकत आहेत. त्यामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे फाटले असून, काचाही फुटल्या आहेत. एखाद्या पत्र्याच्या आड कोणी झोपले असेल, तर डोक्याला गंभीर इजा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक निखिल वारे, राहुल गोणे, आरती परदेशी, अंबिका गंगीशेट्टी, उषा औटी, कृष्णा शिंदे, वैभव साळवे, अरुणा कांबळे, कमल आडेप आणि राऊत आदी उपस्थित होते. नगरसेवक निखिल वारे यांनी यावेळी बोलताना सांगितले कि या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. अशा घटनांनी सामाजिक शांततेला बाधा पोहोचत आहे. संबंधित अज्ञात समाजकंठकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस प्रशासनाकडे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी व दहशत निर्माण करणार्या अज्ञात समाजकंठकां वर कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशी यांनी केली आहे.