पुणे : चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. इंदापूरमधील मौजे तावशी गावात ही घटना घडली आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडली. हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४ रा. गंगाखेड, जि.परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३० रा. गोखळी, ता. फलटण, जि.सातारा आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३ , रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली.
(संग्रहित दृश्य.)
वालचंदनगर परिसरात तावशी गावातील स्मशानभुमीत एक मृतदेह जळत असून, चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडले आहेत, अशी माहिती पोलील पाटलांनी १६ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे स्मशानभुमीतील लोखंडी जाळीवर पुर्णपणे जळालेली हाडे, तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. चितेजवळ पडलेल्या लाकडावरही रक्ताचे डाग दिसत होते. सरणावर फक्त काही हाडे उरली होती. यामुळे नेमका प्रकार लक्षात येत नव्हता. मात्र रक्ताचे डाग ताजे असल्याने हा खूनाचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना होता. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही तपासात सहभागी झाले. दोन्ही पथकांनी इंदापुर, माळशिरस आणि फलटण तालुक्यात तपास केला. मात्र, काही धागेदोरे हाती लागले नव्हते, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(संग्रहित दृश्य.)
जगताप नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय आरोपी दादासाहेबला संशय होता. त्यामुळे त्याने मित्र विशाल याच्याशी संगनमत केले. जगताप यांना १५ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सतोबाची यात्रा येथे जाऊ, असे सांगितले. त्यानंतर इंदापुर येथील तावशी गावातील स्मशानभुमीजवळ त्यांनी गाडी थांबवली. तेथे जगताप यांच्या डोक्यात दांडके मारुन खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह स्मशानभुमीत जाळून टाकला.
पोलिसांना लाकडे एका वखारीमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांचे पथक पोहोचले. आरोपी दादासाहेब आणि विशाल हे दोघे अंत्यविधीसााठी लाकडे घेऊन गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिली. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस कर्मचारी शैलेश स्वामी,गुलाबराव पाटील,गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे, विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर यांनी याप्रकरणाचा तपास केला.