महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराची आज सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यासाठी सभा घेतली आहे. अमोल खताळ यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्याशी होणार आहे. या सभेतून सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर जोरदार तोफ डागली. सुजय विखे म्हणाले, आजचा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आजची गर्दी पाहिल्यानंतर २३ तारखेला संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणून वेळेवर सभा संपून मला बायकोला जेवायला घेऊन जायचं आहे. आम्हाला इथे मैदान मिळालं नाही. इथलं जाणता राजा मैदान चार दिवस काँग्रेसने बुक केलं, पण एकही सभा त्यांनी तिथे घेतली नाही. पण यांना माहित नाही, हम जहा खडे होते हे लाईन वहा से शुरू हो जाती है, असा टोला त्यांनी बाळासाहेब थोरातांना लगावला.
(संग्रहित दृश्य.)
जनता या निवडणुकीत तुमचा माज मोडल्याशिवाय…
जनसामान्यांचा जनसागर रस्त्यावर उतरला आहे. इथले आमदार रोज शिर्डीत सभा घेत होते. त्यांनी जिल्ह्यातला राज्यातला आणि देशातला प्रत्येक नेता सभेसाठी आणला होता. शरद पवार, प्रियांका गांधी या सगळ्यांना आणलं. मला विचार पडत होता हे इतके मोठे नेते का आणत आहे? संगमनेरमध्ये ४० वर्षात काही विकास केला नाही म्हणून ते नेत्यांना शिर्डीला विकास दाखवायला आणत होते. आमच्या मतदारसंघात सगळे साऊंड सिस्टिमपासून तर सभेला आलेले लोक संगमनेरमधून आले होते. मात्र, इथे आलेले सगळे संगमनेरचेच आहेत. यापुढे संगमनेरमध्ये दडपशाही चालणार नाही हा संकल्प संगमनेरकरांनी केला आहे. आमच्याकडे नारा दिला दहशत से आजादी, इथे जेवढे बसले त्यातील कोणीही सांगा मला कोणी घाबरता का? मग दहशतीपासून कोणाची आजादी यांना करायची आहे. चाळीस वर्षात ज्यांचं तुम्ही कंबरडे मोडले, ती जनता या निवडणुकीत तुमचा माज मोडल्याशिवाय राहणार नाही. ते भाषणातून सांगतात धांदरफळ मधून मी पळून गेलो. वाघ जेव्हा दोन पावलं मागे जातो, तो मोठी झेप घेण्यासाठी, आणि आजची सभा मोठी झेप आहे. त्यादिवशी माझ्या केसाला जरी धक्का लागला असता तर काहीही घडलं असतं. मात्र, संगमनेरला वाचवण्यासाठी मी दुसऱ्या मार्गाने गेलो. तुम्ही पळण्याच्या काय गोष्टी करतात. बांगड्या हातात घालून धमक्या देतात. आज आलोय परत संगमनेरमध्ये रात्री ८:०० वाजेपर्यंत बसून राहतो, या कोणाला यायचं, असे थेट आव्हान सुजय विखेंनी थोरातांना दिले आहे. सुजय विखे म्हणाले, तळेगावच्या काँग्रेसच्या सभेला बाहेरून विद्यार्थी आणले होते. त्यांचे कर्मचारी तिथे येऊन बसले होते. या निवडणुकीत त्यांचाच कर्मचारी त्यांचे बिऱ्हाड बांधल्याशिवाय राहणार नाही. आमचा माणूस चुकला, आम्ही मान्य करतो. आमच्या व्यासपीठावर घटना घडली. आम्ही दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, आमच्या महिलांना मारहाण केली, गाड्या जाळल्या त्याची माफी तुम्ही मागितली का? संगमनेर बंद करण्यात ते नेहमीच पुढे असतात. ऑइल मिल बंद, पेपर मिल बंद, जिनिंग प्रेस बंद, निळवंडेच काम यांनीच बंद केलं. आता २३ तारखेला यांचंच काम बंद करायचं आहे. २० तारखेला मतदान, २३ ला मतमोजणी आणि माझा वाढदिवस २४ तारखेला आहे. त्यादिवशी संध्याकाळी टायगर पुन्हा संगमनेरमध्ये वाढदिवस साजरा करायला येणार, असेही सुजय विखेंनी म्हटले. काल आमचा प्रचार करणाऱ्या एका मुलाला तुम्ही मारलं. काही कार्यकर्त्यांना पैशाचा आमिष देत आहे. आली रे आली आता तुमची बारी आली, असा इशारा देखील सुजय विखेंना बाळासाहेब थोरातांना दिलाय.