नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (दि.२एप्रिल) लोकसभेत सादर केले जाणार आहे. या दृष्टीने सरकारची तयारी पूर्ण झाली आहे. अशामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याला पाठिंबा दर्शवणार का ? असा सवाल विचारण्यात येत होता. अशामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत विधान केले असून भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबध नाही तसेच आम्हाला भाजपने हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. असे म्हणत संजय राउत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत फिरतो आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. वक्फ सुधारक बील आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. वक्फ बील संदर्भात जे बील आले त्यात सरकार काही बदल करू पाहत आहे. पण त्या बिलाला देशातील फक्त मुसलमानांचा विरोध आहे असे नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही पूर्णपणे पाठिंबा नाही. असा दावा संजय राउत यांनी यावेळी केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
देवेंद्र फडणवीस हे नकली स्वयंसेवक – संजय राउत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी आता ७५ वर्षांचे होतील. त्यामुळेच संघाच्या मुख्यालयात त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. संघ ही भाजपची मातृसंस्था असून याच मातृसंस्थेमुळे भाजपचे सरकार आले आहे. भाजपमध्ये किंवा त्यांच्या राजकारणात संघाचे महत्त्व काय ? हे मी सांगावे लागणे म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे नकली स्वयंसेवक आहेत. असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संघ आणि भाजपच्या संबंधांवर मी बोलणे चुकीचे आहे. पण, इतर पक्षांमध्ये काय चालले आहे? याची माहिती ते ठेवतात. तशीच त्यांच्यात काय सुरू आहे? याविषयीची माहिती आमच्याकडे असते. आम्ही देशात राज्यात राजकारण करत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ही माहिती असून आम्ही त्यांच्या अंतर्गत बाबींवर लक्ष ठेवून असतो.