मावळातील पवनानगर परिसरात भाजप पदाधिकाऱ्याचा हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मित्रासह तिघांना अटक केले आहे. निलेश दत्तात्रय कडू, वय ३२, रा. सावंतवाडी, पवनानगर, ता. मावळ असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय बाळू घायाळ रा. सावंतवाडी, पवनानगर, ता. मावळ, पियूष विश्वनाथ डोंगरे, साहिल साईनाथ जाधव ,दोघे रा. प्रभाचीवाडी, ता. मावळ यांना अटक करण्यात आले आहे.
(संग्रहित दृश्य.)
हातऊसने दिलेल्या पैशांमधून त्यांच्यात वाद झाले.
निलेश कडू भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीचा पदाधिकारी होता. आरोपी बाळू घायाळ आणि निलेश कडू मित्र आहेत. हातऊसने दिलेल्या पैशांमधून त्यांच्यात वाद झाले होते. निलेश कडू आणि घायाळ यांच्याविरुद्ध कामशेत आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते. निलेश कडू आणि आरोपी घायाळ, डोंगरे, जाधव प्रभाची वाडी परिसरात रात्री दारु पित होते. हातऊसने दिलेल्या पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी निलेश कडू याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून घायाळने कडूचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर त्याला तळेगाव दाभाडे परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार डोंगरे, जाधव यांच्याशी संगनमत करुन खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केले आहे.