पुणे: पुणे शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या आणि खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. अशातच जुन्या वादातून एकाने थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ मधील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नंदकिशोर यादव याच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. गोळीबार केलेल्या आरोपींचा शोध सध्या देहूरोड पोलीस करत आहेत.
(संग्रहित दृश्य.)
गोळीबाराच्या घटना थांबेना…..
काही दिवसांपुर्वी पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये देखील गोळीबार झाला होता. या गोळीबाराने शहर हादरलं होतं. चुलत भावाने भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. कौटुंबिक वाद आणि ईर्षा यातून जीवे मारण्याची सुपारी दिली गेली होती. संग्राम सिंग असं सुपारी देणाऱ्या चुलत भावाचे नाव आहे. त्याने अजय सिंगची हत्या करण्यासाठी चौघांना सुपारी दिली होती. हत्येच्या उद्देशाने कैलास स्टील कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजय सिंगवर गोळीबार झाला होता. गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडेला उत्तर प्रदेशातून पोलिसांनी अटक केल्यावर चुलत भावाचे बिंग फुटले होते. अजय सिंग आधी संग्राम कडे कामाला होता, अजयला या स्टील क्षेत्रात संग्रामनेचं आणलं होतं. मात्र अजय मोठा होऊ लागला, हे संग्रामला पचत नव्हतं. यातून संग्रामने अजयची सुपारी दिली आणि सगळा प्रकार घडला होता. या दरम्यानच्या काळात चुलत भाऊ जखमी भावाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये देखील आला होता. पिंपरीचिंचवड पोलीस काय-काय तपास करतायेत, याची ही माहिती तो घेत होता. मात्र अखेर पोलीस तपासात त्यानेच सुपारी दिल्याचं उघडकीस झालं. हे ऐकून अजयला मात्र विश्वास बसला नव्हता.