राज्यात शिवसेना पक्षफुटीनंतर शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं नाव यावरुन मोठा वाद झाला होता. अखेर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना चिन्ह व पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. तर उद्धव ठाकरेंना नव्याने पक्षाचे नाव व चिन्ह देण्यात आलंय. शिवसेना युबीटी हे पक्षाचे नाव आणि मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला देण्यात आलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकांवेळी निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल चिन्ह हे संभ्रम करणारं असल्याचे सांगत ठाकरे गटाने एक मशालीचे चिन्ह आयोगाला सूचवले होते. मात्र निवडणूक आयोगाने ते चिन्ह नाकारले असून आम्ही दिलेलं मशालीचं चिन्हच तुम्हाला वापरावं लागेल असे स्पष्ट केले आहे. त्यावरुन आज उद्धव ठाकरेंनी मशालीचं चिन्ह दाखवत उमेदवार व शिवसैनिकांना आवाहन केलंय.
(संग्रहित दृश्य.)
राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने धक्का दिलाय.
कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने धक्का दिलाय. राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश झाला आहे. कोकणातील शिवसेना नेते आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजित यशवंतराव यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षात त्याचं स्वागत केलंय. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हाबाबत माहिती दिली. दरम्यान आईस्क्रीमचा कोन आणि निवडणूक आयोगाने दिलेले मशालीचं चिन्ह हे काही प्रमाणात समान दिसून येते. त्यामुळे हे चिन्ह संभ्रम करणारं असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. पण आयोगाने त्यांची मागणी फेटाळली आहे. आपलं मशालीचं चिन्ह हे आहे. कारण आपण निडणूक आयोगाकडे दिलेलं मशालीचं चिन्ह त्यांनी मान्य केलं नाही. निवडणूक आयोग म्हणाले मशालीचं चिन्ह हेच आहे. तेच तुम्हाला घ्यावं लागेल. त्यानुसार आपण मशालीचं हे चिन्ह घेतलं आहे. हे चिन्ह घेऊन देखील, त्यांनी संभ्रम निर्माण करुनही आपले महाराष्ट्रात ९ खासदार निवडून आले आहेत. आता ही मशाल घरोघरी पोहचली असून मनामनात पेटलेली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. अजित ७ वर्षानंतर तुम्ही शिवसेना परिवारात परत आला आहात. एक उमदा तरुण, सुशिक्षित व मनापासून काम करणारा माणूस आपल्यासोबत येत असल्याचा मला आनंद आहे. कोणतीही राजकीय अपेक्षा न ठेवता अजित आले आहेत. अनेकजण येऊ इच्छितात पण तिकीट पाहिजे म्हणतात, तुम्ही विदाऊट तिकीट आला आहात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित हे उमेदवारीसाठी आले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र तुमच्या भविष्याची जबाबदारी माझी आहे, तुम्ही अजित आहात, यशवंत व्हा, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.