नागपूर : शहरातील नामांकित औषधविक्रेत्याने बहिणीच्या मुलाला दुकानात व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्या युवकाने मामाच्या दुकानात १५ कोटींचा गैरव्यवहार करीत दीड कोटी रुपये प्रेयसी आणि डान्सबारवर उडवले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मामा इंदरचंद लखीचंद जैन यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी भाचा देवेश चोरडिया याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
(संग्रहित.छायाचित्र)
डान्सबार आणि प्रेयसीवर तो लाखो रुपये उडवायला लागला.
इंदरचंद लखीचंद जैन ( वय ६८, शांतीनगर कॉलनी) हे शहरातील नामांकित औषध व्यापारी आहेत. त्यांची कोट्यवधीत वार्षिक उलाढाल आहे. त्यांचे गंजीपेठ येथे असलेल्या जयहिंद फार्मकेअर संदेश दवा बाजार नावाने औषधालय आहे. मोठा व्यवसाय असल्यामुळे दुकानात आपल्या विश्वासाची व्यक्ती असावी म्हणून जैन यांनी त्यांच्या बहिणीचा मुलगा देवेश चोरडीया याला दुकानात व्यवस्थापक म्हणून ठेवले होते. २०२१ पासून देवेश चोरडिया हा दुकानात नित्यनियमाने नोकरी करायला लागला होता. सुरुवातीला त्याने सर्वच काम शिकून घेतले आणि औषध खरेदीचा -विक्री व्यवहार स्वत: करायला लागला होता. भाच्याच्या हातात व्यवहार असल्याने मामा जैन यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. यादरम्यान त्याला दारु आणि डान्सबारचा शौक लागला. तो दुकानातील काही पैशाचा गैरव्यवहार करून मुंबईला जाऊन डान्सबारमध्ये पैसे उडवायला लागला. त्याला डान्सबारचे व्यसन लागल्याने तो दर १५ दिवसानंतर विमानाने जाऊन मौजमजा करीत होता. यादरम्यान देवेशला मुंबईतील एक पबमध्ये एक तरुणी भेटली. तिला पाहताच देवेश तिच्या प्रेमात पडला. दोघांची मैत्री झाल्यानंतर तरुणीने देवेशकडील कोट्यवधी रुपयांची उलाढाल बघता तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली. प्रेयसीसाठी तो काहीही करायला तयार होत होता. प्रेयसीला महागडे गिफ्ट आणि हॉटेलिंग करायला तो नागपुरातून मुंबईला जात होता. डान्सबार आणि प्रेयसीवर तो लाखो रुपये उडवायला लागला.
(संग्रहित,छायाचित्र.)
मामाची तब्बल १५ कोटी रुपयांची फसवणूक केली.
मामा इंदरचंद जैन यांना ज्योत फार्मा नावाची कंपनी स्वस्तात औषधी देणार असल्याचे देवेशने सांगितले. त्यासाठी काही पैसे अॅडव्हान्समध्ये द्यावे लागतील असे सांगून एक कोटी रुपये उकळले. त्यानंतर ज्योत फार्मा नावाची बनावट कंपनी स्थापन करून त्या कंपनीच्या नावाने स्वत:चे बँक खाते उघडले. नागपुरातील एका कंपनीकडून औषध विकत घेऊन तो ज्योत फार्माच्या नावाने खपवून घेत होता. त्यातून मामाचे पैसे स्वत:च्या खात्यात वळते करीत होता. अशाप्रकारे त्याने ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ यादरम्यान तब्बल १५ कोटी रुपयांची मामाची फसवणूक केली. मात्र त्याने बँक खात्यात केवळ दीडच कोटी रुपयांचा व्यवहार केला. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी देवेशविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.