केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यांवर भाष्य केलं आहे. ज्या लोकांनी मागील जन्मी पाप केलेलं असतं ते लोक या जन्मी साखर कारखाना काढतात असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच मला पहिल्यांदाच साखर कारखान्यात फायदा झाला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील अनेक मंत्री आमदार व खासदारांचे साखर कारखाने आहेत. यापैकी अनेक साखर कारखाने डबघाईला आले आहेत. तर काही साखर कारखान्यांवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज आहे. बऱ्याचशा साखर कारखान्यांचा पैशांची अफरातफर (मनी लॉन्डरिंग) करण्यासाठी वापर केल्याचा आरोप असून या कारखान्यांची सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाकडून चौकशी चालू आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी या वक्तव्याद्वारे कोणत्या नेत्याला चिमटा काढला आहे का? असा प्रश्न पडला आहे.
(संग्रहित दृश्य.)
दोन नेत्यांनी असाच एक साखर कारखाना माझ्या गळ्यात बांधला.
नितीन गडकरी म्हणाले जे लोक मागील जन्मी पाप करतात ते या जन्मी साखर कारखाना काढतात किंवा वर्तमानपत्र सुरू करतात भांडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन नेत्यांनी असाच एक साखर कारखाना माझ्या गळ्यात बांधला. ते दोघे कारखाना माझ्याकडे सोडून निघून गेले. मी त्यांना खूप आग्रह केला होता की माझी साखर कारखाना काढण्याची इच्छा नाही. मात्र त्यांनी माझं काही ऐकलं नाही. कारखाना माझ्या गळ्यात बांधला. माझी एक सवय आहे, मी जे काम करायला घेतो ते सोडत नाही. त्यामुळे मी तो कारखाना चालवला. भंडारा, गोंदियाच्या विकासासाठी हा साखर कारखाना मी चालू ठेवला आहे. आता ६०० कोटी रुपये खर्च करून या कारखान्या विस्तार करणार आहे. याचा दोन्ही जिल्ह्यांना खूप फायदा होईल. लोकसत्ताच्या इथेनॉल परिषदेतही नितीन गडकरी यांनी त्यांच्या साखर कारखान्यांवर भाष्य केलं होतं. विदर्भात चार साखर कारखाने सुरू करून मी चूक केली अशी कबुली गडकरी यांनी दिली होती.
(संग्रहित दृश्य.)
अमेरिकेपेक्षाही आपली लोकशाही अधिक प्रगल्भ आहे.
अमरावतीच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले आपल्या देशातलं राजकारण बदलत चाललं आहे. आपली लोकशाही चार स्तंभांवर उभी आहे. त्यांचा समतोल राहिला तर लोकशाही यशश्वी होते. आपण (भारत) जगातली सर्वात मोठी लोकशाही आहोत. म्हणूनच भारताला लोकशाहीची जननी असं संबोधलं जातं. इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षाही आपली लोकशाही अधिक प्रगल्भ आहे. त्यात आपल्या वर्तमानपत्रांचा वाटा देखील मोठा आहे. लोकप्रबोधन, लोकशिक्षण व लोकसंघर्ष या त्रिसुत्रीवर आधारित आपल्या वर्तमानपत्रांचं कार्य चालत आलं आहे. ज्या ज्या वेळी देशावर संकटं आली आहेत, त्या त्या वेळी आपल्या पत्रकारांनी देशाला आणि समाजाला मार्गदर्शन केलं आहे, ही गोष्ट आपण विसरू शकत नाही.