TIMES OF NAGAR
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या अनेक देशांवर त्यांचं टेरिफ अस्त्र उगारलं आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच भारतावर अमरिकेने तब्बल २६ टक्के समन्यायी व्यापारकर अर्थात रेसिप्रोकल टैरिफ लागू केला आहे. अर्थात भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर हा २६ टक्के कर लागू असेल. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अमेरिकन शेअर बाजारात तीव्र पडसाद उमटले असतानाच भारतीय शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने २ एप्रिलपासून नवे व्यापार कर लागू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार नव्या करांची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केली आहे. त्यानुसार भारतावर तब्बल २६ टक्के रेसिप्रोकल टेरिफ लागू करण्यात आले आहे. आशिया खंडातील भारताच्या सक्षम स्पर्धकांपेक्षा हे दर कमी असले तरी अनेक आशियायी देशांपेक्षा ते जास्त असल्यामुळे त्याच्या परिणामांबाबत जाणकारांमध्ये संमिश्र मतं दिसून येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्केतर व्हिएतनामवर तब्बल ४६ टक्के समन्यायी व्यापार कर लागू केला आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारताला चीन व व्हिएतनाम या दोन्ही देशांकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. याशिवाय थायलंडवर ३६ टक्के, इंडोनेशियावर ३२ टक्के कर लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर याचा भारताला एका अर्थाने फायदाच होणार असल्याचं बोललं जात असलं तरी इतर आशियायी देशांपेक्षा भारतावर लागू केलेला व्यापार कर जास्त आहे. ट्रम्प यांनी बुधवारी (दि.२) घोषणा केल्याप्रमाणे, जपानवर २४ टक्के, दक्षिण कोरियावर २५ टक्के, मलेशियावर २४ टक्के, युरोपियन युनियनवर २० टक्के तर ब्रिटनवर ३२ टक्के टेरिफ आकारण्यात आले आहे. दरम्यान एआयसह अनेक प्रचलित तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक असणाऱ्या चिपचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणाऱ्या तैवानला या टेरिफ दरांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तैवानवर अमेरिकेकडून तब्बल ३२ टक्के समन्यायी व्यापार कर लागू करण्यात आला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच दौरा आटोपला आहे. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. पण मी त्यांना म्हणालो तुम्ही चांगले मित्र आहात पण तुम्ही आम्हाला चांगली वागणूक देत नाही. ते आपल्यावर ५२ टक्के व्यापार कर आकारतात. पण आपण मात्र त्यांच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून जवळपास शून्य कर आकारत आलो असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.