विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे अडचणीत आले आहे. विनोद तावडे यांनी नालासोपाऱ्यात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विवांता हॉटेलमध्ये तब्बल तीन ते साडेतीन तास रोखून धरलं होतं. विनोद तावडे यांच्याजवळून पैसे आणि डायऱ्या सापडल्याचा दावा हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. तसेच, तावडे आणि नालासोपाऱ्यातील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधून स्पष्टीकरण द्यावं, यावर हितेंद्र ठाकूर यांच्यासह क्षितिज ठाकूर अडून बसले आहे. अखेर तावडे, राजन नाईक, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी एकत्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विनोद तावडे यांनी मोजक्या वाक्यात प्रतिक्रिया देत काढता पाय घेतला. मतदानादिवशी आचारसंहितेसंदर्भातील नियमांची माहिती मी दिली. त्यामुळे कुठेही आचारसंहितेचा भंग झाला नाही. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी पुढील चौकशी करावी, असं सांगत हात जोडले आणि हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीवर थाप टाकत विनोद तावडे पत्रकार परिषदेतून निघून गेले. राजन नाईक यांनी म्हटलं, विनोद तावडे यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मी आग्रह केला होता. त्यानंतर तावडे हे आले होते. त्याच पार्श्वभूमीवर तावडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. कुठल्याही प्रकारे मतदारांशी संपर्क करून आग्रह करा. लोकसभेत मतदान ५२ टक्के होते. मतदान वाढण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन तावडेंनी केलं.