चाकण : पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने घरातच आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार चाकण परिसरामध्ये घडला आहे. लग्नाआधी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर धारदार चाकूने गळ्यावर, पोटावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे समोर घडली आहे. पतीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
लग्नाच्या आधीपासून प्रेमसंबंध….
सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय वर्षे २३ , रा. जतपुरा, रोहतास, उत्तर प्रदेश) आणि अंकिता अजय कुमार सिंग (वय २६, रा. सावरदरी, जोंधळजाई मंदिराच्या शेजारी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अजयकुमार सिंग (वय २८ ) असे पतीचे नाव असून या हल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजयकुमार हे सुरीन अॅटोमोबाईल कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी अंकिता हिचे लग्नाच्या आधीपासून सचिनकुमार याच्याशी प्रेमसंबंध होते. हे पती अजयकुमारला माहिती होते. त्याने अंकिताला सचिनकुमार याच्याबरोबर बोलत जाऊ नको, असं सांगितलं होतं.
(संग्रहित दृश्य.)
प्रियकरासोबत मिळून पतीवर हल्ला…..
मात्र, रविवारी(दि.१६) रात्री जेवण करुन अजयकुमार घरात झोपले होते. त्याचवेळी रात्री उशिरा, रुममध्ये कोणीतरी बोलत असल्याच्या आवाजाने अजयकुमार यांना जाग आली. रात्री साडेबारा वाजता अजयकुमार झोपलेल्या रुममध्ये अंकिता आणि सचिनकुमार आल्याचे त्याने पाहिले. अजयकुमारने त्यांना जाब विचारला असता अंकिता आणि सचिनकुमार या दोघांनीही अजयकुमार यांना थेट मारायला सुरवात केली. सचिनकुमारने जोरात अजयकुमारला जमिनीवर ढकलून देत त्याच्या डोक्यात दांडके मारले. त्यानंतर भाजी कापण्याची धारदार सुरी आणत त्यांच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. अजयकुमारने त्यांच्या ताब्यातून सुटका करत घराबाहेर धाव घेतली. त्याचा आवाज ऐकुन लोक बाहेर आले असता लोकांनी खोलीला बाहेरुन कडी लावत अंकिता आणि सचिनकुमार यांना आतमध्ये कोंडून ठेवलं. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. असून अजयकुमारला रुग्णवाहिकेतून संत तुकाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे महाळुंगे पोलिसांनी सांगितले.