मुंबई : चैत्यभूमी येथील दि.१४ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये धुसफूस नाही तर सगळं खुशखुश आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज झाल्याचं कळतंय. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंप्रमाणे दोन नंबरचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील खट्टू झाल्याचं कळतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही. अजित पवार तर राज्यापाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले. तर एकनाथ शिंदे देखील कार्यक्रमानंतर तडकाफडकी ठाण्याला गेल्याची माहिती समोर आली. आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यानं शिंदे समर्थक देखील नाराज झालेत. ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनात कुणी बदल केला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दि.१३ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रायगड दौऱ्यावर आले होते. या आधी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि.१३ एप्रिल ) सकाळी अमित शाह यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी तब्बल अर्धा तास वन टू वन चर्चा केली. एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबतच्या या भेटीत काही मुद्द्यांवरुन आपली नाराजी व्यक्त केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर निधीवाटपावरुन नाराजी व्यक्त केली होती. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब एकनाथ शिंदे यांनी शहांच्या लक्षात आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले.
(संग्रहित दृश्य.)
काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरु अजित पवार…
अमित शहा असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार व्यक्त केली.रायगडाच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही. आपण काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरु आहे. डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे. तो सुद्धा आम्ही दिला आहे त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगितलं जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.