काँग्रेसच्या चुकीच्या अर्थधोरणामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहिला. सिंचन, रस्ते यावर भर दिला असता तर खेड्यातून होणारे स्थलांतर झाले नसते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मिरजेत केले आहे. मिरजेत भाजप उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार खाडे यांच्यासह नीता केळकर, मकरंद देशपांडे, जनसुराज्यचे समित कदम आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, अलाहाबाद न्यायालयाचा इंदिरा गांधी यांची निवड अवैध ठरविणारा निकाल आल्यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली. यावेळी घटनेत बदल करण्यात आला होता. मुळात घटनेच्या मूलभूत तरतुदीमध्ये कोणालाही कसलाही बदल करता येत नाही. तरीही हा बदल करण्यात आला. मात्र, आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पक्षाने केलेला बदल रद्द करून मूळ घटना कायम केली आहे. मात्र आता हातात घटना घेऊन यामध्ये बदल करण्याचा अपप्रचार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे सत्ता काँग्रेसच्या हाती होती. त्यावेळी रशियन अर्थधोरणेच्या धर्तीवर आपली अर्थधोरणे अवलंबून होती. यामुळे गावखेड्याच्या प्रगतीकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. स्मार्ट शहराप्रमाणे स्मार्ट खेडी व्हायला हवीत. ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी. माझ्याकडे जलसंपदा विभाग आल्यानंतर ५० टक्के पूर्ण झालेल्या सिंचन योजनांना ६ हजार कोटी रुपये केंद्रातून दिले. यामुळे टेंभू, म्हैसाळ योजनांना गती मिळाली आहे. जिल्ह्यात महामार्गाच्या कामावर १२ हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आला. देशात पैशाचा तुटवडा नाही. मात्र, प्रामाणिक नेत्यांची कमी आहे. चुकीच्या हातात सत्ता दिली तर त्याचे परिणाम आपणास भोगावे लागतात. यामुळे या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रगतीसाठी भाजपला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जाता जाता त्यांनी सांगलीसाठी विमानतळ आणि लॉजिस्टिक पार्क मंजूर केले जाईल, असेही सांगितले.