अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजवत आहे, मात्र याच सिनेमामुळे अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत सापडला आहे. शुक्रवारी (१३ डिसेंबरला) पोलिसांनी त्याला अटक केली. संध्याकाळी त्याला तेलंगणा हायकोर्टाने जामीन मंजूर केला, मात्र तरीही त्याला एक रात्र तुरुंगात राहावं लागलं. आज (शनिवारी, १४ डिसेंबरला) सकाळी त्याची सुटका झाली. जामीन मिळूनही अल्लू अर्जुनला तुरुंगात रात्र का घालवावी लागली ? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा 2: द रुल’च्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात होती. हैदराबाद येथील स्थानिक न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. अभिनेत्याला पाहण्यासाठी त्याचे चाहते मोठ्या संख्येने कारागृहाबाहेर जमले होते. मात्र, त्याला शुक्रवारी नाही तर शनिवारी सकाळी सोडण्यात येईल, असं सांगण्यात आलं होत.

जामीन मिळूनही तुरुंगातच ?  

शुक्रवारी उशिरापर्यंत तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाची प्रत मिळाली नव्हती, त्यामुळे हायकोर्टाने जामीन देऊनही अल्लू अर्जुनला रात्र तुरुंगात काढावी लागली, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली. तसेच अंतरिम जामीन आदेशात त्रुटी होती, त्यानंतर एक नवीन आदेश जारी करण्यात आला, जो शुक्रवारी रात्री उशिरा कारागृहात पोहोचवण्यात आला. जामिनाच्या प्रतीची तपासणी करणं आवश्यक होतं, त्यामुळे अल्लू अर्जुनची शुक्रवारी सुटका करणं शक्य नाही, असं तुरुंग प्रशासनाने नमूद केलं. टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पत्रकारांना  सुटकेबद्दल माहिती दिली. उद्या सकाळी (शनिवारी) अल्लू अर्जुन सोडण्यात येईल असं ते म्हणाले होते.

Allu Arjun slept on the floor in the jail cell did not eat food the whole  night-जेल की कोठरी में फर्श पर सोए अल्लू अर्जुन, रातभर नहीं खाया खाना |  Jansatta(संग्रहित दृश्य.)

तपासात पूर्ण सहकार्य करणार..

अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी हैदराबाद तुरुंग अधिकाऱ्यांवर जामीन आदेशाचे पालन न केल्याबद्दल टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना रेड्डी म्हणाले, तुम्ही सरकार आणि संबंधित विभागाला प्रश्न विचारायला पाहिजे की त्यांनी अल्लू अर्जुनची सुटका का केली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट लिहिलंय की ज्या क्षणी तुम्हाला (तुरुंग अधिकाऱ्यांना) आदेश मिळेल, लगेच त्याला सोडण्यात यावं. स्पष्ट आदेश असूनही त्यांनी सुटका केली नाही, याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. ही अटक बेकायदेशीर आहे आणि आम्ही यासंदर्भात कायदेशीर पावले उचलू. अल्लू अर्जुनला शनिवारी सकाळी सोडण्यात आलं. त्यानंतर तो हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील त्याच्या घरी गेला. घराबाहेर त्याने चाहत्यांची भेट घेतली. सर्वांचे आभार मानले, तसेच घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. घडलेली घटना दुर्दैवी होती, या प्रकरणाच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार, असं अल्लू अर्जुन याने म्हंटले आहे. त्यानंतर त्याने पत्नी स्नेहा रेड्डी व मुलांची भेट घेतली.