नगर शहर विधानसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर रिंगणात उतरणार आहेत. एकीकडे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी नक्की असल्याने दोन अडीच महिन्यांपूर्वीच संपर्क अभियान सुरू केले होते. त्याचवेळी मविआमध्ये जागा कोणाला सुटणार इथ पासून तिढा होता. परंतु माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उमेदवारी गृहीत धरून महिनाभरापासून तयारी चालवली होती. परंतु त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होत नव्हता. आज उमेदवारी निश्चित झाल्यानं कळमकर आता आणखी जोमाने लढत देण्यास सज्ज झाले आहे. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेसमधील इच्छुकांची मोट बांधण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
नगरचे महापौरपद ही भूषविले होते.
अभिषेक कळमकर हे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. एकत्र राष्ट्रवादीत असताना त्यांनी नगरचे महापौरपदही भूषविले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ दिली. तेव्हापासूनच ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते. त्यांनी नगर जनसंवाद यात्रा काढून शहरातील सर्व प्रभाग पिंजून काढलेत. मविआच्या इतर इच्छुकांच्या तुलनेत कळमकर यांनी संपर्क मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली. शहरातील राजकीय गणिते, मागील काही काळात झालेल्या घडामोडी पाहता पडद्यामागे अजून खूप हालचाली होऊ शकतात. भाजपमधील एक गट शहराची जागा अजित पवार गटाकडे गेल्याने नाराज आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांनी तांत्रिक अडचणींमुळे माघार घेतली असली तरी ते शहरातील आपली राजकीय ताकद दाखवण्यास इच्छुक आहेत. अशा वेळी कळमकर यांना मिळणारी खुली आणि छुपी रसद निवडणुकीची रंगत वाढवणारी ठरू शकते.