TIMES OF AHMEDNAGAR
राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे २६ ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून फरार होता. जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला रोजी अटक झाली आहे. जयदीप आपटे हा कल्याणला त्याच्या आई आणि पत्नीला भेटायला आलो होता, त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जयदीप आपटेला शोधण्यासाठी मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची सात पथकं कसून शोध घेत होती. मात्र जयदीप आपटे त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर बुधवारी (४ सप्टेंबर) संध्याकाळी जयदीप आपटे स्वत:च कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली!
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला होता. दुपारी १ वाजून १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी तर हळहळलेच. मात्र पुतळा पडल्याचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त अतिशय नाराज झाले. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली.तर विरोधकांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटे कुठे आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो फरार झाला होता. तेव्हापासून जयदीप आपटेला अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
संजय राऊतांना तर ठाण्यातल्या एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली.
जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे. जयदीप आपटेची चौकशी केली जाईल त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केलं तो प्रकार दुर्दैवी आहे. आम्ही आधीच सांगितलं की त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवरायांच्या नावाचं जे राजकारण केलं ते दुर्दैवी होतं. संजय राऊतांना तर ठाण्यातल्या एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे असंहि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा दिल्लीतले लोक मातोश्रीवर यायचे आता यांना दिल्लीत जावं लागतं आहे. दिल्लीत जाऊन मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगावं लागतं आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर अशी परिस्थिती होते. आम्ही विकासावर भर दिलाय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.