राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना अजित पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि त्यामध्ये आपल्याला मोठे पद मिळेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये प्रचारादरम्यान बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी एकप्रकारे राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आपला दावा असल्याचे पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. त्यांनी म्हटलं की, मागचं झालं गेलं आता गंगेला मिळालं. विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती तालुक्याचा विकास आणि अधिक फायदा झाला पाहिजे. उद्या काही झालं तरी राज्यात महायुतीचे सरकार येणार,येणार…,येणार… ते सरकार आल्यानंतर आपल्याला तिकडे चांगलं पद मिळणार, मिळणार… मिळणार…, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यावर कार्यकर्त्यापैकी एकाने असे म्हटले, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री होणार, त्यावर अजित पवार हसले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोवण्याच्या सूचना केल्या. महिलांना सांगा योजना बंद होणार नाही. शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना बंद होणार नाही, हे सांगा, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
(संग्रहित दृश्य.)
अजित पवारांच्या बारामती गाव भेट दौऱ्याला सुरुवात.
अजित पवारांच्या बारामती गाव भेट दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज सकाळी अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी गाव भेट दौरा आखला आहे. या दौऱ्यात ५९ गावांना भेटी अजित पवार देणार आहेत. काही दिवसापूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की मला राज्यात लक्ष द्यायचा आहे. त्याच्यामुळे मतदार संघात हा धावता अजित पवारांनी आखलेला आहे. मतदारांना सरकारची भूमिका सरकारने आणलेल्या योजना अजित पवार समजावून सांगत आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्यासमोर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. युगेंद्र पवार यांच्या पाठीशी शरद पवारांची भक्कम ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट सोबत असूनही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. त्यावेळी अजित पवार बराचकाळ बारामती मतदारसंघात ठाण मांडून होते. तरीही अजितदादांना आपल्या पत्नीचा पराभव टाळता आला नव्हता. त्यामुळे आता विधानसभेला बारामतीची जनता काय कौल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.