TIMES OF NAGAR
कल्याणमध्ये सोमवारी (दि.५ ) रात्री बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील इंदिरानगर भागात एका घरात घुसून याच भागातील पाच तरूणांनी कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांची मुलगी यांना लाथाबुक्की, लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीच्यावेळी लाकडी दांडक्याचा एक फटका जोराने भांंडण सोडविण्यासाठी मध्यस्थी पडलेल्या तरुणीच्या डोक्यात बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात कल्याण परिमंडळ तीनचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या आदेशावरून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना (वय ४५ वडील), अब्दुल रहेमान गुलाम सुभानी शेख (वय २०, मुलगा), शोएब रहिम शेख (वय २३), अझिज इब्राहिम शेख (वय २३), शाहिद युसुफ शेख (वय२०) यांना तात्काळ अटक केली आहे. नरामे सानिया मोईन बागवान (वय १९) असे तरुणांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. मयत तरुणीचे वडील निसार सैय्यद नजीर सैय्यद (वय ४०) यांनी या हल्ल्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी मारहाण, खून प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले, तक्रारदार निसार सैय्यद हे पत्नी, मुलगी नरामे सानिया यांच्यासह बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील बुध्द विहारजवळील इंदिरानगर झोपडपट्टीत राहतात. ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान निसार कुटुंबीयांसह घरात भोजन करत होते. त्यावेळी घरात येऊन आरोपी गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना हा दारू पिऊन निसार यांच्या घरात आला. त्याने निसार यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागण्यास सुरूवात केली. निसार यांनी पैसे देण्यास नकार दिला. नकार मिळताच मुन्नाने निसार यांच्या बरोबर वाद घातला. दोघांच्यात झटापटी झाली.
(संग्रहित दृश्य.)
मुलीचा जागीच मृत्यू…
आपल्या वडिलांना निसार सैय्यद यांनी धक्काबुक्की करून भांडण केले, या रागातून मुन्ना याचा मुलगा अब्दुल शेख याने आपल्या आरोपी मित्रांना संपर्क करून बोलावून घेतले. त्यांनी निसार यांना धडा शिकवण्यासाठी ते निसार यांच्या घरात घुसून आमच्या वडिलांना का धक्काबुक्की केली, असे बोलून निसार यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. निसार यांंना लाकडी दांडक्यांनी मारहाण सुरू होताच त्यांची पत्नी आणि मुलगी सानिया हे निसार यांना वाचविण्यासाठी मध्ये पडले. पाच जणांनी आक्रमकपणे हल्ला केल्याने या झटापटीत निसार जखमी झाले. त्यांना सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नी, मुलीला आरोपींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत लाकडी दांडक्याचा जोरदार फटका आरोपींकडून मुलगी सानिया हिच्या डोक्यात बसला. ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सीनियर पोलीस इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक नांगरे यांनी इंदिरानगरमध्ये धाव घेऊन फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक केली.