जुगाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना जामिनासाठी पोलिसांनी लाच मागितल्याची घटनाघडली आहे. ही घटना परभणीच्या पालम पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालम पोलीस स्टेशनच्या सहपोलीस निरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचााऱ्यांना एसीबीनं ताब्यात घेतलं आहे. तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे. परभणीच्या पालम पोलीस स्टेशनमध्ये जुगारप्रकरणी काही आरोपी अटकेत होते. या आरोपींनाच पोलिसांनी लाच मागितल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तीन पोलिसांना एसीबीनं ताब्यात घेतलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
लाचखोरांचा सुळसुळाट…..
दरम्यान, अलिकडच्या काळात लाच घेण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळं राज्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं गेल्या काही महिन्यात धडाडीची मोहीम हाती घेतली आहे. लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना दणका दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल ४१ लाखांची मागणी केली होती. यापूर्वी या प्रकरणात २३ लाख रुपये त्यांच्या घरीही पोहोचले होते. मात्र, आणखी १८ लाख रुपयांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली. अखेर पाण्यासारखं पैसे मागणाऱ्या या लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून लाचखोर विनोद खिरोळकरला अटक केली होती.सांगली जिल्ह्यातही लाच मागितल्या प्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले होते. तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका क्षेत्रातल्या एका २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. दहा लाखांची मागणी करून सात लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळ रचला. त्यानुसार, तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्त यांनी सात लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यावरुन, एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.