
TIMES OF NAGAR
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून या क्षेत्रातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. हॉटेल-रेस्टॉरंट्स आणि फूड कंपन्यांनंतर आता तुकाराम मुंडे यांनी आपला मोर्चा पान मसाल्याचे प्रमोशन करणाऱ्यांकडे वळवला आहे. अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे अब्जावधी रुपयांचे नेटवर्क असलेल्या विमल ग्रुपचा कारभार, कमाई आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या आरोग्य समस्या यावर चर्चा होऊ लागली आहे.
(संग्रहित दृश्य)
गुटखा उद्योग सुमारे ४२,००० ते ४६,००० कोटी रुपयांचा
भारतातील एकूण पान मसाला आणि गुटखा उद्योग सुमारे ४२,००० ते ४६,००० कोटी रुपयांचा मानला जातो. यात विमल ग्रुपचा वाटा मोठा आहे. कंपनीचा वार्षिक महसूल १९०० कोटी रुपयांहून अधिक आहे. भारतातील प्रमुख पान मसाला कंपन्यांमध्ये दिनेश पाउचेस प्रायव्हेट लिमिटेड, डीएस ग्रुप, माणिकचंद ग्रुप, पान बहार प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पान पराग इंडिया लिमिटेड, रेड रोज ग्रुप ऑफ कंपनीज, शिखर ग्रुप आणि विमल पान मसाला कंपनी यांचा समावेश होतो. देशांतर्गत बाजारपेठेतील मोठा हिस्सा या कंपन्यांच्या एकत्रित वाटा आहे.
(संग्रहित दृश्य)
१९९० साली कंपनीची स्थापना तर देशांतर्गत बाजारपेठेतील मोठा हिस्सा….
विमल पान मसाला आणि विमल इलायची या ब्रँडचे संचालन ‘विमल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’द्वारे केले जाते. १९९० साली विमल कुमार अग्रवाल यांनी या कंपनीची स्थापना केली. कंपनीचे दिल्ली येथे मुख्यालय आहे. ‘विमल पान मसाला कंपनी’ ही देशातील पारंपरिक ‘ओरल टोबॅको’ (तोंडात ठेवायची तंबाखू उत्पादने) उद्योगातील एक नामांकित कंपनी आहे. ही कंपनी पान मसाला, गुटखा आणि फ्लेवर्ड टोबॅकोच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
(संग्रहित दृश्य)
तंबाखू वापरात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पान मसाला आणि गुटख्याच्या जाहिरातींमध्ये आलिशान लाईफस्टाईल दाखवली जाते. यात बहुतेक कलाकार हे बॉलिवूड किंवा क्रीडा जगतातील दिग्गज लोक असतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात २७ कोटींपेक्षा जास्त नागरिक तंबाखू किंवा पान मसालाजन्य पदार्थांचे सेवन करतात.मात्र, यांचे सेवन करणाऱ्यांची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. तंबाखू वापरात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, यावरुन याची भीषणता समजू शकते. तंबाखू आणि सिगारेटमुळे देशात दररोज सुमारे ३,५०० लोकांचा मृत्यू होतो. तसेच, तोंडाच्या कर्करोगाने दरवर्षी १० लाख लोक आपला जीव गमावतात.

