लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे एका व्यक्तीच्या डोक्यात कोयत्याचे वार करुन हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधांतून निर्माण झालेल्या वादातून हा खून झाल्याचे समजते. मारेकऱ्यांनी डोक्यात कत्ती आणि कोयत्याचे वार करुन संबंधित व्यक्तीची हत्या केली आहे. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद प्रल्हाद इंगळे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शरद इंगळे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच वादातून हा खून झाला आहे. यानंतर शरद इंगळे याच्या कुटुंबीयांनी मुरुड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता. खून करणाऱ्या पाच लोकांना तात्काळ अटक करावी अशी मागणी शरद इंगळे याच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यासाठी हे सर्वजण तीन तास पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी यापैकी काही जणांना ताब्यात घेतले आहे. शरद प्रल्हाद इंगळे हा खडी केंद्रात मुकादम म्हणून काम करत होता. करकट्टा येथील एका महिलेबरोबर त्याचे अनैतिक संबंध होते. काही महिन्यांपूर्वी दोघेही पळून गेले होते. दोघांची समजूत काढून त्यांना वापस बोलवण्यात आले होते. दोघांची लग्नंही झालेली आहेत. महिलेचा पती मोठा मुलगा आणि एका अल्पवयीन मुलांनी मिळून शरद इंगळे याचा खून केल्याचे बोलल जात आहे. यापैकी दोन जण कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत पळून जात असताना काही लोकांनी पाहिले आहे. कोयता आणि कत्तीचा गंभीर वार करत शरद इंगळेचा खून करण्यात आला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.