रायगड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणीने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुधागड तालुक्यातील परळी येथे मंगळवारी (दि.१३) संध्याकाळी हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार ही तरुणी परळीतील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे नर्स म्हणून कामाला होती. तिच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे या तरुणाने संबंधित तरुणीवर हल्ला केल्याचे समजते. या तरुणाने अत्यंत निर्घृणपणे आपल्या प्रेयसीचा खून केला. त्याने कोयत्याने प्रेयसीच्या मानेपासून संपूर्ण अंगावर सपासप वार केले. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर तरुणानेही स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस ठाण्याअंतर्गत घटनेचा तपास सुरु आहे. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणाच्या वादातून शेखर संतोष दुधाणे (रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड) याने परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम दवाखाना येथे काम करत असलेली आपली प्रेयसी पोर्णिमा अनंत देसाई (रा. देसाईपाडा, ता. सुधागड) हिची हत्या करुन तेथेच स्वतःला गळफास घेऊन संपवले आहे. ही घटना समजताच जांभूळपाडा, पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुलीची हत्या करून स्वतःला संपवण्यामागे कोणत कारण असावं हे अद्याप अस्पष्ट असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.