मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेवेळी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. तर विधानसभेवेळी आपले उमेदवार उभे केले होते. आता महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत असे वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत म्हणाले की राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतो. ते ओपनच आहे तिथे खिचडी पण मिळते. पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक प्रस्ताव मांडला होता. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत आहोत. फक्त आमची अट आणि भूमिका एकच आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या महाराष्ट्रात द्रोहाच्या भूमिका घेतल्या आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये, ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.
(संग्रहित दृश्य.)
संजय राऊतांनी नारायण राणे यांचं केलं कौतुक
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर तुम्ही स्वागत करत आहात. मात्र दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र असतील तर तुम्हाला त्याचं दुःख होत असल्याची टीका अजित पवार गटाकडून केली जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे अमित शाह यांच्या मदतीने शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेले. मी नेहमी दोन नेत्यांचा कौतुक करतो ते म्हणजे राज ठाकरे आणि नारायण राणे. नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. माझी शिवसेना, मीच खरा शिवसेनाप्रमुख असा दावा नारायण राणे यांनी कधी केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमलं नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यांनी राजकारण सुरू केलं. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला. त्यांचे आणि आमचे मतभेद तेव्हा झाले. पण त्यांनी तेव्हा स्वतःचा पक्ष काढून एक राजकारण केलं असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत पुढे म्हणाले की एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी आणि मी बाळासाहेब ठाकरे हे सांगितलेले नाही. अजित पवार सांगताय की मीच खरा. पक्षाचा बाप जन्मदाता तुमच्या व्यासपीठावर बसला आहे आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत असे त्यांनी म्हटले.