चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. यवतमाळच्या घाटंजी येथील नेहरूनगरमध्ये सोमवारी (दि.२१) पहाटे ही घटना घडली आहे. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रफुल गौतम टिपले (वय ४० वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. प्रफुल्लने बायकोच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यवतमाळच्या घाटंजी येथे ही घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून आणि चारित्र्यावर असलेल्या संशयावरून नवऱ्याने झोपेत असलेल्या बायकोच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती गंभीर आहे.
(संग्रहित दृश्य.)
प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक…
ही घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काजल प्रफुल टिपले (वय २५ वर्षे) असं जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दुर्गेश अरुण कुंभारे (वय २४ वर्षे) याच्या तक्रारीवरून आरोपी प्रफुल्लविरोधात घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार दुर्गेशला रात्री २.१५ वाजता त्याचा मित्र सौरभ पाटीलचा फोन आला आणि गाडी घेऊन नेहरुनगरमधील मामा प्रफुल टिपले यांच्या घरी लवकर ये असे सांगण्यात आले. मामाने मामीला कुऱ्हाडीने मारले असे त्याने फोनवर सांगितले. त्यावरुन दुर्गेश हा प्रफुल टिपले यांच्या घरी गेला असता त्याला लोकांची गर्दी दिसली. त्याचा मित्र सौरभ, त्याची आई आणि मामा हे गंभीर जखमी असलेल्या त्याच्या मामीला धरुन बसलेले होते. दुर्गेश आणि सौरभने काजल यांना दुचाकीवर बसवून घाटंजी येथील रुग्णालयात नेले. तेथे डाक्टरांनी प्रथमोपचार करुन त्यांच्या गळ्यावर गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचाराकरीता शासकीय रुग्णालय यवतमाळ येणे रेफर केले. त्यामुळे सौरभ आणि त्याच्या आईने काजलला यवतमाळ येथे नेले. त्यानंतर दुर्गेशने घाटंजी पोलिस ठाणे गाठून प्रफुल गौतम टिपले विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.