TIMES OF AHMEDNAGAR
अशोक चव्हाण यांना पक्षात ओढल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात ओढण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी टाईम्स ऑफ अहमदनगरला दिली आहे.
ऐन लोकसभेची २०२४ ची निवडणूक तोंडावर असताना भाजपने रणनिती आखत काँग्रेसला मोठा धक्का दिला. माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन भाजपने मराठवाड्यात आपली ताकद वाढवली आहे. काँग्रेसनंतर भाजप आता राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. अशोक चव्हाण यांना पक्षात ओढल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात ओढण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी टाईम्स ऑफ अहमदनगरला दिली आहे. हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जातंय.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, भाजपकडून या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेल्या या भागातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४२ हून अधिक जागा जिंकायच्या असतील, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल अशी भाजपची भूमिका आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. इतकंच नाही तर मंत्रिमंडळात या नेत्याला महत्त्वाचे खाते देखील मिळणार होते अशा बातम्या मध्यंतरी प्रसारित होत होत्या पण त्या नेत्याने त्याबाबत या अफवांना जास्त महत्व दिले नव्हते.आता हाच बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.