लातूर : लातूर जिल्ह्यात सेक्स रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लातूर शहरातील एका लॉजवर अश्लील प्रकार सुरु असल्याची गुप्त माहिती मिळताच लातूर पोलिसांनी आनंद लॉजवर छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत तुळजापुरचे तरुण नको त्या अवस्थेत सापडले असून त्यातील काही जण क्रिकेटपटू आहेत तर काही पुजारी आहेत. लातूर शहरात काही दिवसांपूर्वी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर आता पुन्हा एकदा लॉजवर छापेमारीत हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार क्रिकेटपटूंसह दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.लातूर शहरातील आनंद लॉजमध्ये सुरु असलेल्या अश्लील प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून लॉजवर सुरु असणाऱ्या देहविक्रीचा पर्दाफाश केला आहे. यात पोलिसांनी पश्चिम बंगालच्या दोन तरुणींची सुटका केली असून या कारवाईत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार संशयित हे धाराशिव जिल्ह्यातील क्रिकेटपटू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं असून, त्यामध्ये सौरभ बिराजदार (२५, जिजामाता नगर, ता. तुळजापूर), समर्थ भोसले (२१, पुजारी, शुक्रवार पेठ), समर्थ कवडे (२२, तुळजापूर), विश्वजीत शिंदे (१९, शुक्रवार पेठ), अमोल काळुंके (२०), संतोष तळेकर (३०) आणि अजय कांबळे (४०, तिघेही लातूर निवासी) यांचा समावेश आहे. हे सर्वजण लॉजमध्ये उपस्थित होते.या प्रकरणात अजून तीन संशयित फरार आहेत. त्यांची नावं किशोर तळेकर, श्याम तळेकर आणि शाहू तळेकर (सर्व रा. म्हाडा कॉलनी, लातूर) अशी आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
(संग्रहित दृश्य.)
स्पा सेंटरमध्ये देह व्यापार….
एका महिन्यापूर्वी (१४ एप्रिल) लातूर पोलिसांनी रिंगरोड परिसरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकत देहव्यापाराचं रॅकेट समोर आणलं होतं. या प्रकरणात सध्या पोलिसांनी एकूण सहा लोकांवर गुन्हा दाखल केला होता.लातूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिंग रोड भागात एका स्पा सेंटरमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला. ही माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लातूर पोलिसांनी स्पा सेंटरवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली. आरोपींच्या चौकशीत काही महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढून अनैतिक धंद्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले. यानंतर चार महिलांना अँटी ह्यूमन ट्राफिकिंग पथकाने सोडवले.