राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आजच पाच जणांना पक्षात प्रवेश देऊन लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होणार ? याची चर्चा होती. त्यावरूनही आता पडदा उठला आहे. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हीला अणुशक्ती नगर विधानसभेसाठी तिकीट जाहीर झाले आहे. तर झिशान सिद्दिकालाही आज पक्षप्रवेश देऊन वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटात आज झिशान सिद्दिकी, निशिकांत पाटील, संजयकाका पाटील, सना मलिक आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना पक्षप्रवेश देण्यात आला. पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

1 इस्लामपूर निशिकांत पाटील
2 तासगाव-कवठे महांकाळ संजयकाका पाटील
3 अणुशक्ती नगर सना मलिक
4 वांद्रे पूर्व झिशान सिद्दिकी
5 वडगाव शेरी सुनील टिंगरे
6 शिरूर ज्ञानेश्वर कटक
7 लोहा प्रताप पाटील-चिखलीकर

आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलशी त्यांचा सामना…..

पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मध्यंतरी दोन टर्म भाजपाकडून सांगलीचे खासदार राहिलेल्या संजय काका पाटील यांनी आज पक्षप्रवेश घेताच त्यांना तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. ते दिवंगत आर. आर. पाटील यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. या मतदासंघात आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलशी त्यांचा सामना होणार आहे. रोहित पाटील अवघ्या २५ वर्षांचे असून त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. तसेच भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्या मुलीलाही उमेदवारी दिली गेली आहे. दाऊदशी संबंधित व्यक्तीशी जमिनीचे व्यवहार केल्यामुळे नवाब मलिक ईडीच्या कारागृहात होते. त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. भाजपाने त्यांना याआधीही कडाडून विरोध केला होता. त्यांच्याजागी मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली  भेट, बंद दाराआड चर्चा - Marathi News | MLA Jayant Patil met Deputy Chief  Minister Ajit Pawar's party ...(संग्रहित दृश्य.)

राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार …..

पुणे पोर्श अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव घेतले गेले होते. त्यांनी अपघाताच्या दिवशी पोलीस ठाणे गाठून अल्पवयीन आरोपीला सोडविण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला गेला होता. मध्यंतरी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीमध्ये आक्रमक प्रचार करत दोन जीव घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा, असा थेट हल्ला आमदार टिंगरेंवर केला होता. इस्लामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही आज अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. त्याना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्याने निवडून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सातत्याने टीका करत आले आहेत. त्यामुळे यावेळी जयंत पाटील यांना मतदारसंघातच आव्हान देण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे.