गेल्या अनेक दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांच्या भेटींचा सिलसिला सुरूच आहे. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत हा भेटीचा सिलसिला होत असल्याने नेमकं काय शिजतंय ? असाच प्रश्न राजकीय वर्तुळातून चर्चिला जात आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीगाठी घेण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांचा समावेश सर्वाधिक आहे. आज छत्रपती संभाजीनगरमधील संदिपान भुमरे जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर उदय सामंत सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. इकडं या भेटी अंतरवाली सराटीमध्ये होत असताना मंत्री दीपक केसरकर सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. अवघ्या दोन मिनिटांची ही भेट असली, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन पोहोचवल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.
(संग्रहित दृश्य.)
जरांगे यांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही.
माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे ठाण्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देण्यात आलेल्या उमेदवार मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटातील राजकीय घडामोडींचे चांगलीच चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची झालेली भेट ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होती असं म्हणता येणार नाही. सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन मी संभाजीनगरमध्ये आलो होतो. मात्र जरांगे यांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही. कोणत्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, यावर चर्चा झाल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. केसरकर यांच्या भेटीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली याबाबत मला माहिती नाही. ते म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांनी मुंबई येथील नगरसेवक फोडले होते. नगरसेवकांना खोके देऊन फोडण्याचा फोन आला होता. अमित ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे काय हे समोर आणल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला. दरम्यान, उमेदवार यादीवर बोलताना ते म्हणाले की राजकारणामध्ये तिकीटावेळी वेटिंग असणे स्वाभाविक आहे. काही घटना घडत असतात, बसून चर्चा करायची असते. मात्र, कोणावरही अन्याय होणार नाही असेही ते म्हणाले.