ठाणे : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी घटस्फोट घेत असल्याने विक्रम भोईर (३५) याने भर रस्त्यात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील एका पाण्याच्या डबक्यात महिलेने उडी घेतल्याने या घटनेत तिचा जीव बचावला आहे. परंतु ती अंदाजे ५० टक्के भाजली असल्याचे समजते. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या जबाबानंतर याप्रकरणी विक्रम भोईर याच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिला ३० वर्षीय असून २०१७ मध्ये तिचा विक्रम भोईर याच्यासोबत विवाह झाला होता. विक्रम हा मुंबईतील विक्रोळी भागात राहत असून तो रिक्षा चालक आहे. विक्रम हा तिच्यावर विनाकारण संशय घेत असल्याने मागील दोन वर्षांपासून ती तिच्या माहेरी ( चितळसर मानपाडा)  येथील निळकंठ वुड्स परिसरातील एका चाळीमध्ये राहत होती. तिने पतीविरोधात ठाणे न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली होती. परंतु विक्रम हा प्रकरणाच्या तारखांना हजर राहत नव्हता. तसेच तिला सोबत राहण्यासाठी सांगत होता. परंतु विक्रम याच्यासोबत राहण्यास महिलेचा विरोध होता.

Tough divorce law forces estranged couples to opt for separation instead |  Latest News India - Hindustan Times(संग्रहित दृश्य.)

लाईटरने तिला पेटवून……..

सोमवारी (दि.२४) ती दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळेस विक्रम हा रिक्षामधून त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्याने तिला अडवून घटस्फोटाच्या कारणावरून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादानंतर  त्याने रिक्षामध्ये ठेवलेले लोखंडी पाईप आणि पेट्रोलने भरलेली बाटली बाहेर काढली. त्याने लोखंडी पाईपने महिलेच्या डोक्यावर प्रहार केला. तो पाईप फेकून दिल्यानंतर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर हातातील लाईटरने तिला पेटवून दिले. पेट घेतल्यानतर तिने धावत परिसरातील एका पाण्याच्या डबक्यात उडी मारली. या दरम्यान, विक्रम हा रिक्षा घेऊन तेथून निघून गेला. घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत ती अंदाजे ५० टक्के भाजल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली आहे. महिलेचा जबाब नोंदविल्यानंतर विक्रम भोईर (३५) याच्याविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.