नगरकर शहरातील खड्ड्यांना वैतागलेत, कोणी ठेकेदार देतं का ठेकेदार …….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR MUNICIPAL CORPORATION AHMEDNAGAR | MUNICIPAL ADMINISTRATOR PANKAJ JAWLE | MLA SANGRAM JAGTAP | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरात रस्त्यांच्या बाबतीत बोंबाबोंब सुरूच असते. नगरकर शहरातील खड्ड्यांना वैतागले असल्याचे सोशल मिडीयावरून वारंवार व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून स्पष्ट होते. शहरातील महत्वाचा भाग सोडला तर केडगाव, बोल्हेगाव- नागापूर आणि सावेडी उपनगरातील काही भागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. येथील रस्त्यांचे कामे तर दूरच साधे पॅचिंगचे काम देखील अनेक वर्षांपासून रखडले आहेत. मात्र सध्या महानगर पालिकेत प्रशासकराज असल्याने संपूर्ण जबाबदारी हि प्रशासकांवर आहे. प्रशासक शहराचा चेहरा बदलण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र काही राजकारण्यांकडून श्रेयापोटी प्रशासकांच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्त्रोत.सोशल मिडीया.
ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत.
महापालिकेने पॅचिंगच्या कामासाठी तिसऱ्यांदा निवदा काढूनही ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत आहे. उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे, तर काही ठिकाणी एक ते दिड फुट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामासाठी प्रत्येकी ५० लाख रूपये खर्चाच्या दोन निविदा मागवल्या आहेत. परंतु या निविदांना ठेकेरांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्याकडेही ठेकेदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
स्त्रोत.सोशल मिडीया.
जुन्या कामाची बिले मिळत नसल्याने ठेकेदार नवीन कामे घेण्यास तयार नाहीत.
एकीकडे खड्डयांमुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे, तर दुसरीकडे पॅचिंगसाठी ठेकेदार मिळत नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरू असल्याने स्थानिक नगरसेवक देखील बघ्याची भूमिका घेत आहेत. एकीकडे मध्यवर्ती शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत, तर दुसरीकडे उपनगरातील रस्त्यांना कोणीच वाली नसल्याची परिस्थिती आहे. मध्यवर्ती शहरात १४४ कोटी रूपये खर्चाच्या भुमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. इतर काही मोठी विकासकामे देखील रखडली आहेत. केडगाव उपनगरातील शाहूनगर रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शहरात विविध प्रकारची विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांना त्यांच्या कामाची बिले वेळेत मिळत नाहीत, या ठेकेदारांची कोट्यवधी रूपयांची बिले महापालिकेकडे थकीत आहेत. जुन्या कामाची बिले मिळत नसल्याने ठेकेदार नवीन कामे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे रखडली आहेत. ठेकेदारांचे बिल देण्याचा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.