TIMES OF NAGAR
राज्यातील अनुसूचित जातीच्या १ हजार उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, निटकॉन दिल्ली या संस्थांच्या वतीने मोफत जर्मन भाषेचे अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिने असून यासाठी ( दि.२५ ) मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप व प्राप्त लाभांच्या माहितीसाठी उमेदवारांनी बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. बार्टीमार्फत मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवाराकडे राज्यातील अनुसूचित जातीचा दाखला असावा. ८ लाख रुपयांपर्यंतची उत्पन्न मर्यादा असावी. वयोमर्यादा १८ ते ३५ आणि आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पदवी, पदविका शिक्षण आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रे यांच्या पूर्ततेसाठी मदत केली जाणार आहे. यामध्ये नर्सिंग, लॅब असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाची पदविका, पदवी, तर अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमातील बीसीए, बीबीए पदवी आणि हाऊसकिपर्स किंवा क्लीनर अभ्यासक्रमाची पदवी, अकाउंटिंग विषयातील बीकॉम किंवा एमकॉम, मार्केटिंग किंवा सेल्समधून एमबीए, आयटीआय किंवा पदविका किंवा पदवी घेतलेले इलेक्ट्रिशियन्स आणि ऑटोमोबाइल पदवी घेतलेले उमेदवार हे प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतील.