नागपूर : शहरातील महाल गांधी गेट परिसरात उसळलेल्या दंगलीने वेगळेच वळण घेतले आहे. भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उगारला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी महिला पोलिसाची वर्दी फाडण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. महिला पोलिसांशी केलेल्या या गैरवर्तनामुळे सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशा दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी महाल गांधी गेट परिसरात औरंगजेबाचे छायाचित्र आणि त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केले मात्र त्यावर हिरव्या रंगाची चादर होती. ती चादर सुद्धा जाळण्यात आली त्यामुळे मुस्लिम बांधवांनी आक्षेप घेत समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यानंतर सोमवारी (दि.१७) सायंकाळी दोन्ही गटात संघर्ष उफाळून आला आणि तासाभरात दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले. सोमवारी (दि.१७) रात्री हिंसाचार उसळल्यानंतर सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करत होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेतन कदम, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आणि पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यासह काही पोलिस कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकातील महिला पोलीस तिथे गेले. जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ केली. पोलिसांवर हल्ला चढविला. त्यांना मारहाणही केली. एका जमावाने महिला पोलिसाला पकडले. तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करीत गैरवर्तन केले. वेळीच महिला पोलिसाने स्वत:ची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. दरम्यान नागपूरमध्ये महाल परिसरात सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर महाल मोमीनपुऱ्याशिवाय शहरातील अतिसंवेदनशील अकरा व संवेदनशील एकोणीस ठिकाणी पोलिसांचे पथके तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात सशस्त्र पोलीस २४ तास गस्त घालत आहेत. अजूनही या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. रस्त्यावर शुकशुकाट असून पोलीस अजूनही दंगलखोरांची धरपकड करत आहेत.