नागपूर : एक तरुण आणि तरुणी गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी प्रेमविवाह करण्यास नकार दिला. तरुणीचे अन्य युवकाबरोबर लग्न ठरवले असल्याचे प्रियकराला कळताच तो प्रेयसीच्या लग्नात थेट तलवार घेऊन पोहचला. त्याने तलवार दाखवून नवरदेवाला आणि त्याच्या नातेवाईकांना धमकी देणे सुरु केले. गोंधळ घालत असतानाच वधूच्या भावाचा मित्र मध्यस्थी करायला आला असता प्रियकराने लग्नमंडपातच त्या मध्यस्थी करायला आलेल्या मित्राचा भोसकून खून केला. ही थरारक घटना गृहमंत्र्यांचे शहर अशी ओळख असलेल्या नागपुरात घडली आहे. विहांग (२३, टेकानाका) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपीलनगरात राहणारी २२ वर्षीय युवती प्रिया (बदललेले नाव) उच्चशिक्षित असून तिचे आरोपी युवक बिरजू याच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण कुटुंबियांना लागली होती. तसेच बिरजूवर काही गुन्हे दाखल आहेत आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, अशी माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे कुटुंबियांनी प्रियाला तंबी दिली आणि लग्नास विरोध दर्शविला. तिने बिरजूला लग्नास नकार देऊन कुटुंबियांमुळे अडचण येत असल्याचे सांगितले. मात्र, बिरजूला प्रियासोबतच लग्न करायचे होते. त्यामुळे तो प्रियाला पळून जाऊन प्रेमविवाह करण्यास तयार करत होता. मात्र, तिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करणार नाही असे बीर्जुला सांगितले होते. त्यामुळे बिरजू चिडून होता. त्याने प्रियाच्या वडिलांची भेट घेऊन प्रीयासोबत लग्न करण्याची बोलणी केली. मात्र, तिच्या वडिलांनी त्याला स्पष्ट नकार देऊन त्याला हाकलून दिले. त्यामुळे बिरजू संतापला होता.
(संग्रहित दृश्य.)
नवरदेवांकडील मंडळींना मंडपात धमकी….
बिरजूच्या त्रासामुळे प्रियाच्या वडिलांनी घाईघाईत प्रियाचे लग्न ठरवले होते. ही माहिती मिळताच बिरजूने प्रेमिका प्रियाचे लग्न मोडण्याचा कट रचला.प्रियाच्या हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी बिरजू तिच्या घरी पोहचला. त्याने प्रियाच्या कुटुंबीयांशी वाद घालून लग्न मोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र, कपीलनगर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे हे हत्याकांड घडले. छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात शुक्रवारी लग्न लागत होते. त्या दरम्यान बिरजू हा साथिदारांसह तलवार घेऊन लग्न मंडपात घुसला. त्याने नवरदेवांकडील मंडळींना धमकी दिली. दरम्यान, वधूच्या भावाचा मित्र विहंग याने बिरजूशी चर्चा केली. त्याला लग्न मंडपातून बाहेर जाण्यास सांगितले. बिरजूने विहंगच्या पोटात तलवार भोसकून खून केला. या हत्याकांडामुळे मंगल कार्यालयात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे.